
मराठीजनांच्या घराघरांत वाचलं जाणारं वृत्तपत्र म्हणजे ! मराठमोळी संस्कृती व परंपरा जपणारं हे वृत्तपत्र आता ६०व्या वर्षात प्रवेश करत आहे ही गोष्ट खूपच आनंदाची आहे. सातत्यपूर्ण यश फार महत्त्वाचं; त्यामुळे महाराष्ट्र टाइम्सची आजवरची ५९ वर्षांची वाटचाल ही कौतुकास्पद आहे. या वाटचालीत ''ने आम्हाला... आम्हा वाचकांना समृद्ध केलं आहे. महाराष्ट्र टाइम्सचं मराठमोळं रूप मला भावतं आणि त्यांनी आजही ते टिकवलं आहे हे विशेष. आपले सण, परंपरा याची अभिमानाने दखल घेणारं हे वृत्तपत्र आहे. महाराष्ट्र टाइम्सचं आणखी एक वैशिष्ट्य जाणवतं ते म्हणजे वृत्तपत्राचा खप वाढविण्यासाठी त्यात मुद्दाम काही वादग्रस्त, सनसनाटी लिहिलं गेलं नाही, आणि लिहिलं जातही नाही. आज सर्वच क्षेत्रांत कमालीची स्पर्धा आहे. वृत्तपत्रंही त्यास अपवाद नाहीत. या स्थितीत आपलं स्थान राखण्यासाठी महाराष्ट्र टाइम्सने कधीही अनुचित गोष्टींचा आधार घेतला नाही, कोणालाही दुखावलं नाही ही गोष्ट दाद देण्यासारखीच. लेखणीची ताकद फार मोठी असते. महाराष्ट्र टाइम्सने या ताकदीचा नेहमी चांगल्यासाठीच उपयोग केला. संतुलित बातम्या, माहितीपूर्ण लेख, वाचनीय पुरवण्या, दर्जेदार दिवाळी अंक ही 'मटा'ची अन्य वैशिष्ट्येही सहज जाणवतात. बातम्या व लेखांची मांडणी, रंगसंगती अतिशय नेत्रसुखद असते. आमचं कुटुंब अगदी सुरुवातीपासून 'मटा'चं वाचक आहे. महाराष्ट्र टाइम्स वाचणं हा आमच्यासाठी रोज सकाळचा एक प्रसन्न अनुभव असतो. लेखक, कलावंत, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते यांच्यासाठी हे हक्काचं व्यासपीठ आहे. या साऱ्यांविषयी 'मटा'मध्ये नेहमीच आवर्जून, आपुलकीने लिहिलं जातं. ही आपुलकी आम्हां सर्व भावंडांनादेखील वेळोवेळी लाभली. केवळ आमच्याविषयीच नाही, तर, आमचे बाबा मा. दीनानाथ यांच्यावरही 'मटा'ने अनेकदा अगत्याने लेख प्रसिद्ध केले आहेत. बाबांच्या ७५व्या पुण्यतिथीनिमित्त संवाद पुरवणीत मी लिहिलेला 'असामान्य धैर्यधर' हा लेख, किंवा बाळने गेल्या वर्षी माझ्या वाढदिवसानिमित्त लिहिलेला 'स्वरमाउली' हा लेख... असे अनेक लेख या क्षणी मला आठवत आहेत. विविध क्षेत्रांतील नामवंतांच्या योगदानाची दखल घेत महाराष्ट्र टाइम्सतर्फे दरवर्षी 'महाराष्ट्र भूषण' हा पुरस्कार दिला जातो. मला आठवतंय, 'मटा'च्या या पुरस्काराची पहिली मानकरी मी होते. (त्यावेळी 'मटा'च्या दिवाळी अंकात आठवणी, मनोगत या स्वरूपात मी एक विस्तृत लेख लिहिला होता.) पुढे आशा व हृदयनाथलादेखील या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. या जिव्हाळ्याबद्दल, सन्मानाबद्दल आमचं कुटुंब महाराष्ट्र टाइम्सचे आभारी आहे. पुढील वाटचालीसाठी महाराष्ट्र टाइम्सला मन:पूर्वक शुभेच्छा! (शब्दांकन- अनिरुद्ध भातखंडे)