आजोबांना सेल्फी भोवली; ४०० फूट दरीत पडले - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, October 12, 2019

आजोबांना सेल्फी भोवली; ४०० फूट दरीत पडले

https://ift.tt/31cJqjT
नवी मुंबईः सेल्फीचं वेड फक्त तरुण-तरुणींना लागलं नाही. तर यात आजी-आजोबा हेही बरेच पुढे गेले आहेत. माथेरानला फिरायला गेल्यानंतर काढण्याच्या नादात एका आजोबाचा जीव थोडक्यात बचावला. सेल्फी काढण्याच्या नादात पाय घसरल्याने हे आजोबा ४०० फूट खोल दरीत कोसळले होते. परंतु, दैवं बलवत्तर होतं म्हणून ते वाचले. दरीत पडल्यानंतर त्यांना स्थानिक बचाव पथकाने सुखरूप बाहेर काढले असून त्यांना किरकोळ जखम झाली आहे. अजित प्रभाकर बर्वे (वय ५८) असं त्यांचं नाव आहे. ते मुंबईतील विलेपार्ले या ठिकाणी राहतात. दोन दिवसापूर्वी ती माथेरानला फिरण्यासाठी गेले होते. ते त्या ठिकाणी एका हॉटेलमध्ये राहत होते. बुधवारी ते सकाळी साडे नऊच्या सुमारास सेल्फी पॉइंट (इको पॉइंट) वर फिरण्यासाठी गेले होते. सुरक्षा कठडे ओलांडून दरी पाहत असताना तसेच मोबाइलवर सेल्फी काढत असताना त्यांचा तोल गेला व ते खाली कोसळले. हिरवे गवत ओले असल्याने अचानक पाय घसरून ते ४०० फूट खोल दरीत कोसळले. पण दैवं बलवत्तर म्हणून ते डोंगराच्या मध्यावर अडकून पडले. त्यानंतर ‘वाचवा वाचवा’ असे ओरडू लागले. हा प्रकार पोलिसांना समजताच हवालदार सुनील पाटील, नारायण बार्शी, पोलीस नाईक महेंद्र राठोड, शिपाई प्रशांत गायकवाड, राहुल पाटील, राहुल मुंढे यांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना रेस्क्यू टीमच्या साहाय्याने सुखरूप बाहेर काढले, अशी माहिती पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत काळे यांनी दिली. सह्याद्री रेस्क्यू टीमच्या सुनील कोळी, सुनील ढोले, अमित कोळी, अक्षय परब, उमेश मोरे, संतोष केळगणे, अमोल सकपाळ यांना पोलिसांनी पाचारण केले. त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता या आजोबांना सुखरूप बाहेर काढले. दरीत दोरीच्या सहाय्याने उतरून तब्बल दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर बर्वे यांना सुखरूप बाहेर आणण्यात सह्याद्री रेस्क्यू टीमला यश आले. त्यांच्या शरीरावर कुठेही इजा झाली नसली तरी पोलिसांनी बर्वे यांना तातडीने रुग्णालयात नेले. सह्याद्री रेस्क्यू बचाव पथकाच्या या धाडसाचे कौतुक होत आहे.