चंदीगड/नवी दिल्ली: हरयाणातील भाजप सरकारसोबत युती करणाऱ्या जननायक जनता पक्षाचे प्रमुख यांचे वडील यांची आज सकाळी तिहार तुरुंगातून सुटका करण्यात आली. दोन आठवड्यांसाठी त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. अजय चौटाला हे भाजप-जेजेपी सरकारच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. शिक्षक भरती घोटाळ्यात दोषी ठरलेले चौटाला यांना विशेष सीबीआय न्यायालयानं १० वर्षांची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात अजय चौटाला यांचे वडील ओमप्रकाश (दुष्यंत यांचे आजोबा) चौटाला यांच्यासह एकूण ५५ जणांना दोषी ठरवण्यात आलं होतं. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दुष्यंत चौटाला यांच्या जेजेपी पक्षानं १० जागा पटकावल्या आहेत. बहुमतापासून दूर राहिलेल्या भाजपनं 'जेजेपी'शी युती करण्याचा निर्णय घेतला आहे. अजय चौटाला यांच्या सांगण्यावरूनच दुष्यंत यांनी ही युती केली आहे. तुरुंगातून बाहेर आलेल्या अजय चौटाला यांनी स्वत:च ही माहिती दिली. 'भाजपसोबत जाण्याचा दुष्यंत यांचा निर्णय योग्य आहे. माझ्या परवानगीनंच त्यानं हा निर्णय घेतला होता,' असं चौटाला म्हणाले. दुष्यंत यांची इंडियन नॅशनल लोकदलातून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर त्यांनी स्वत:चा नवा पक्ष स्थापन केला होता. केवळ ११ महिन्याच्या या पक्षानं हरयाणातील लोकांची मनं जिंकत विधानसभेत दमदार एण्ट्री केली आहे. फर्लो कधी दिला जातो? अर्ध्याहून अधिक शिक्षा भोगलेल्या कैद्याला फर्लो अंतर्गत चार आठवड्यांची सुट्टी दिली जाते. सामाजिक व कौटुंबिक कारणांसाठी ही रजा दिली जाते. पोलीस महासंचालकांकडं (तुरुंग) यासाठी अर्ज केला जातो. हा अर्ज नंतर गृहविभागाकडं पाठवण्यात येतो. त्यावर १२ आठवड्यांत निर्णय घेतला जातो. फर्लो हा कैद्याचा अधिकार असतो. मात्र, केवळ अधिकार म्हणून त्याची मागणी केली जाऊ शकत नाही. 'फर्लो' अंतर्गत मिळालेल्या सुट्टीएवढी जास्त शिक्षा कैद्याला भोगावी लागते.