मुंबई: अवघ्या ८० तासांत मुख्यमंत्रिपदाची खुर्ची गेल्यामुळं धक्का बसलेले भाजपचे गटनेते देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या दिवसापासूनच नव्या सरकारवर टीका सुरू केली आहे. शपथविधीच्या दिवशी सरकारवर प्रादेशिक भेदभावाचा आरोप करणाऱ्या फडणवीस यांनी आज पुन्हा ट्विट केलं आहे. मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत शेतकऱ्यांऐवजी बहुमत सिद्ध करण्याविषयी खलबतं झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या सरकारचा शुक्रवारी शिवाजी पार्कवर ऐतिहासिक शपथविधी पार पडला. उद्धव ठाकरे यांनी हजारोंच्या साक्षीनं मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत अन्य सहा मंत्र्यांनीही पद व गोपनीयतेची शपथ घेतली त्यानंतर संध्याकाळी लगेचच मंत्रिमंडळाची बैठक झाली व त्यात काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मात्र मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णय व चर्चेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. फडणवीस यांनी आज सलग तीन ट्विट केले आहेत. 'काल झालेल्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यावर चर्चा करण्याऐवजी लपूनछपून बहुमत कसे सिद्ध करता येईल, यावर चर्चा झाल्याचं फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. हे सरकार बहुमताचे दावे करत असेल लपून-छपून सभागृह बोलावण्याचा प्रयत्न का होत आहे,' असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. विधानसभेच्या हंगामी अध्यक्षांना नियमबाह्य पद्धतीनं बदलण्याचा प्रयत्न होत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. स्वत:च्या आमदारांवर नव्या सत्ताधाऱ्यांचा अजूनही इतका अविश्वास का? अजूनही त्यांना डांबून ठेवण्याची शिक्षा का? भाजपने विरोधी पक्षात बसण्याची घोषणा केली असताना आणि महाविकास आघाडीने निरनिराळ्या प्रकारे बहुमताचे प्रदर्शन आणि दावे केले असताना ही लपवा-छपवी आणि भीती का? महाराष्ट्राला याचं उत्तर हवं आहे,' असं फडणवीस यांनी शेवटी म्हटलं आहे.