मुंबई: महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री कोण या चर्चेला आज अखेर पूर्णविराम मिळाला आहे. महाविकास आघाडीचं उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेलं आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून नाना पटोले हे अर्ज दाखल करणार आहेत. महाविकास आघाडीची बहुमत चाचणी आज विधानसभेत होत आहे. 'काँग्रेसकडून नाना पटोले हे विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरतील. ते ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना विधीमंडळ कामकाजाचा अनुभव आहे,' अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि विधीमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी आज स्पष्ट केले. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. नव्या सरकारचा विश्वासदर्शक ठराव आज पटलावर येणार आहे. त्यासाठी विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे. या अधिवेशनासाठी हंगामी अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीच्या दिलीप वळसे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे हे पद यापुढेही राष्ट्रवादीकडे जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. जर विधानसभा अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे गेलं तर उपमुख्यमंत्रिपद स्वाभाविकपणे काँग्रेसकडेच जाईल अशी शक्यताही त्यामुळे वर्तवण्यात येत होती. पण या सर्व शक्यतांना आज पूर्णविराम मिळाला आहे. विधानसभा अध्यक्ष काँग्रेसचा आणि उपमुख्यमंत्रि राष्ट्रवादीचा हे आता स्पष्ट झाले आहे.