
मुंबई: अवघ्या तेवीसाव्या वर्षी व्यवसायिक असलेल्या आणि हातात कायद्याची पदवी असलेल्या मुलंडच्या धवल चोपडा याच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवला गेला आहे. सनदी लेखापाल (सीए) परीक्षेत धवलने देशात तृतीय क्रमांक पटकावला आहे. सीए परीक्षेचा अंतिम निकाल गुरुवारी लागला असून नव्या अभ्यासक्रमानुसार ५१२५, तर जुन्या अभ्यासक्रमानुसार ९४४६ विद्यार्थ्यांना सनद देण्यात आली आहे. नव्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेत कोलकात्याचा अभय बजोरिया आणइ नोएडाटा सूर्याश अगरवाल यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तर जुन्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेत विजयवाड्यातील गुराम प्रणीथने देशात प्रथम स्थान प्राप्त प्राप्त केले. धवल चोपडा ८०० पैकी ५३१ गुण मिळाले आहेत. त्याला ६६.३८ टक्के इतके गुण मिळाले. या परीक्षेत नव्या अभ्यासक्रमात १५.१२ टक्के विद्यार्थी, तर जुन्या अभ्यासक्रमानुसार १०.१९ टक्के विद्यार्थी यशस्वी ठरले. इतके मोठे यश आपल्याला अपेक्षित नव्हते असे धवलने प्रतिक्रिया देताना सांगितले. माझे सेंकड ग्रुपसाठीचे प्रयत्न थोडो कमी पडले होते. असे असतानाही मोठे यश मिळाले हे माझ्यासाठी एक सरप्राइझ होते. मी माझ्या मित्रासोबत अभ्यास केला. जेव्हा आमची उमेद कमी व्हायची, किंवा आता हे सोडून द्यावे असे वाटायचे तेव्हा त्यावर मात करून आम्ही दररोज एकमेकांना प्रेरित करण्याचे काम करायचो, असे धवलने सांगितले.