लग्नात नेहा पेंडसेने घेतला मजेशीर उखाणा! - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, January 6, 2020

लग्नात नेहा पेंडसेने घेतला मजेशीर उखाणा!

https://ift.tt/2MZJoHV
मुंबई- टीव्ही अभिनेत्री नेहा पेंडसेने काल मराठमोळ्या पद्धतीने शार्दुल सिंगशी पुण्यात लग्न केलं. यावेळी नेहाने फिकट गुलाबी रंगाची नऊवारी साडी नेसली होती. तिच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. नाकात पारंपरिक मोठी नथ, चंद्रकोर, हिरवा चुडा आणि केसांत गजरा यांमुळे नेहाचा लुक खुलून दिसत होता. शार्दुलनेही फिकट गुलाबी रंगाचा कुर्ता घातला होता. यावर फिकट गुलाबी आणि मोरपिशी रंगाचा फेटा बांधला होता. त्यांच्या प्रत्येक फोटोमध्ये नेहा आणि शार्दुल फार आनंदी दिसत होते. या सगळ्या लग्न सोहळ्यात अभिनेता अभिजीत खांडकेकरने नेहाचा लग्नातला एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला. यात नेहा मजेशीर उखाणा घेताना दिसते. तिच्या चेहऱ्यावर उखाणा घेतानाचा आनंद स्पष्टपणे दिसतो. उखाण्यात नेहा म्हणते की, 'चांदीच्या ताटात फणसाचे गरे, शार्दुलराव आहेत बरे, पण वागतील तेव्हा खरे..' नेहाचा हा उखाणा ऐकल्यावर तिच्या बाजूला उभा असलेला शार्दुल तिच्याकडे पाहून हसतो आणि मान हलवतो. नेहा- शार्दुलच्या लग्नाला मराठी सिनेसृष्टीतील अनेक स्टार उपस्थित होते. यातही नेहाचे सर्वात जवळचे मित्र- मैत्रिणी अभिजीत खांडकेकर, त्याची पत्नी सुखदा खांडकेकर, श्रृती मराठे, हेमांगी कवी, संस्कृती बालगुडे आणि दिशा दांडेकर उपस्थित होते. नेहाने साखरपुड्याला गडद हिरव्या रंगाचा वेस्टर्न गाऊन घातला होता. या गाऊनमध्येही ती फार सुंदर दिसत होती. नेहा आणि शार्दुलच्या हळदीचे आणि संगीतचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. संगीतवेळी दोघांनी मल्टिकलर ड्रेस घालण्याला प्राधान्य दिलं होतं. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत नेहा म्हणाली की, लग्नात ती नऊवारी साडी नेसणार आहे. पण ही साडी थोडी हटके असणार आहे. याचं कारण म्हणजे नऊवारी साड्या या गडद रंगाच्या असतात. याशिवाय महाराष्ट्रीयन पारंपरिक साड्याही गडद रंगाच्या असतात. पण नेहा तिच्या लग्नात इतरांपेक्षा वेगळी अशी नऊवारी साडी नेसणार आहे. लग्नाबद्दल बोलताना नेहा म्हणाली की, 'मी माझ्या स्वप्नातल्या राजकुमाराशी लग्न करत आहे. मी नवीन आणि सुंदर कुटुंबात जात आहे.' नेहा आणि शार्दुल अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. शार्दुलचा सिनेसृष्टीशी थेट संबंध नसून तो व्यावसायिक आहे. काही महिन्यांपूर्वी नेहाने शार्दुलशी साखरपुडा झाल्याचे सोशल मीडियामार्फत सांगितले होते. नेहाचा नवरा हा सिनेसृष्टीतील नाही. महाराष्ट्रातील राजकीय कुटुंबाशी त्याचा संबंध आहे.