मुंबई: रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसाने मुंबईला अक्षरश: झोडपून काढले आहे. पावसामुळे मुंबईतील सखल भागात गुडघाभर पाणी साचल्याने वाहतुकीची कोंडी झाली असून घराघरांमध्ये पाणी भरल्याने मुंबईकरांना संपूर्ण रात्र जागून काढावी लागली आहे. तसेच रेल्वे रुळावरही पाणी भरल्याने पश्चिम आणि हार्बर रेल्वे ठप्प झाली असून मध्य रेल्वेवरील वाहतूक धीम्यागतीने धावत आहे. कांदिवली येथे डोंगराचा भाग कोसळल्याने मीरा रोडहून मुंबईकडे येणारी वाहतूकही ठप्प झाली असून रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईचं जनजीवन ठप्प झालं आहे. आणि शहरामध्ये मध्यरात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दादर, कुर्ला, सायन, मुलुंड, माटुंगा, हिंदमाता, अंधेरी, घाटकोपर, गोरेगाव, मालाड, जोगेश्वरी, कांदिवली, बोरिवली, गोवंडी या भागामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. अजूनही या भागात पावसाचा जोर कायम असल्याने मुंबईतील सखल भाग पाण्याने भरून गेले आहेत. मुंबईतील दादर हिंदमाता, सायन, किंग्ज सर्कल, माटुंगा, अंधेरी सबवे आणि कुर्ला परिसर जलमय झाला आहे. हिंदमातामध्ये तर दोन ते तीन फूट पाणी भरल्याने येथील वाहतूक कोंडी झाली आहे. हिंदमाता येते तर वाहनांमध्ये पाणी शिरल्याने वाहने बंद पडली आहेत. हिंदमातामध्ये पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन पंपाद्वारे पाणी काढण्यास सुरुवात केली आहे. दहिसर येथील दौलत नगर भागातील दहिसर नदीला पूर आला असून नदीने अक्राळविक्राळ रुप धारण केलं आहे. रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरले आहे. घरांमध्ये पाणी शिरल्याने मुंबईकरांना रात्रभर जागून काढावी लागली आहे. तसेच रेल्वे रुळावरही पाणी साचल्याने त्याचा अत्यावश्यक सेवेतील कामगारांना मोठा फटका बसला आहे. रेल्वे रुळावर पाणी साचल्याने पश्चिम आणि हार्बर रेल्वे पूर्णपणे ठप्प झाली आहे. कुर्ला आणि सीएसएमटी दरम्यानची हार्बर रेल्वे बंद झाली आहे. तर मध्य रेल्वेवरील वाहतूक अत्यंत धीम्यागतीने सुरू आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कामगारांचे हाल झाले आहेत. पावसामुळे सखल भागात पाणी साचल्याने बेस्टनेही वाहतुकीचे आठ मार्ग बदलले आहेत. मुंबईत २३० मिली मीटर ते पश्चिम आणि पूर्व उपनगरात १६२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कांदिवलीत डोंगराचा भाग कोसळला कांदिवलीत पश्चिम द्रुतगती मार्गावर डोंगराचा काही भाग कोसळला. एका कार समोरच हा भाग कोसळला असून विजेचा खांबही कोसळला आहे. त्यामुळे संपूर्ण मातीचा ढिगारा रस्त्यावर आल्याने मीरारोडहून मुंबईला येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. मात्र, मुंबईहून मीरारोडला जाणारा मार्ग सुरू आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवलीत मुसळधार मुंबईप्रमाणेच जिल्ह्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि बदलापूरमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. ठाण्यात घोडबंदर येथे पाणी साचल्याने या भागात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे. ४८ तास रेड अॅलर्ट येणाऱ्या ४८ तासात मुंबईसह ठाण्यात होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. हवामान खात्याने रेड अॅलर्ट जारी केला असून नागरिकांना कारण नसताना घराच्याबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. तसेच मच्छिमारांनाही समुद्रात न जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.