इंदूर: सामूहिक बलात्काराच्या घटनेने हादरले आहे. पतीच्या गळ्यावर चाकू ठेवून त्याच्या डोळ्यांदेखत पत्नी आणि १२ वर्षांच्या मुलीवर सहा मास्कधारी व्यक्तींनी केला. मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूरमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा ही घटना घडली. सामूहिक बलात्कार प्रकरणातील संशयित आरोपींची अद्याप ओळख पटू शकलेली नाही. आरोपींना पकडण्यासाठी पोलीस पुरावे गोळा करत आहेत. या प्रकरणाचा तपास खारगोन रेंजचे डीआयजी टिळक सिंह करत आहेत. त्यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन विचारपूस केली. आतापर्यंत ५० हून अधिक संशयितांची चौकशी केली आहे. तसेच या प्रकरणात अनेक संशयितांना ताब्यात घेतले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित कुटुंब हे एका खाणीजवळ राहतात. तेथेच पीडित महिलेचा पती हा सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. शुक्रवारी रात्री हे कुटुंब झोपेत होतं. त्याचवेळी काही शस्त्रधारी गुंड घरात घुसले आणि त्यांनी सुरक्षा रक्षकाला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याच्याकडील होते नव्हते ते पैसे त्यांनी काढून घेतले. त्यानंतर त्यांनी महिलेला आणि तिच्या १२ वर्षांच्या मुलीला फरफटत शेतात नेले. तिथे त्या दोघींवर सामूहिक बलात्कार केला. दरम्यान, शेजारी राहणाऱ्या ६५ वर्षीय व्यक्तीनं त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींनी त्यांना बांधून मारहाण केली. एका व्यक्तीनं त्याच्या गळ्यावर चाकू ठेवला आणि इतर जणांनी महिला आणि मुलीवर अत्याचार केले. दुसऱ्या दिवसापर्यंत या घटनेची माहिती कुणालाही नव्हती. मात्र, जेव्हा खाणमालक नेहमीप्रमाणे त्यांना भेटण्यासाठी आला असता, ही धक्कादायक घटना उघडकीस आली. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. फॉरेन्सिक तज्ज्ञही होते. घटनास्थळावरून त्यांनी पुरावे गोळा केले. गावापासून ५ किलोमीटरवर ही घटना घडली. या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.