मुंबई : सध्या कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदीवर दबाव आहे. मागील आठवड्यात सोने-चांदीमध्ये नफावसुली झाली होती. त्यामुळे सोने जवळपास १२०० रुपयांनी स्वस्त झाले होते. दिवाळी पाडवा आणि भाऊबीजेनिमित्त सोमवारी शेअर बाजार बंद होता तर कमॉडिटी बाजारात संध्याकाळी ५ वाजता ट्रेडींग सुरु झाले. ज्यात सोने आणि चांदीमध्ये किंचित वाढ झाली. बाजार बंद होताना सोने ३०० रुपयांनी तर चांदी १००० रुपयांनी महागली. सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ५१००० रुपयांवर गेला होता. आज मंगळवारी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये (MCX) सोन्याच्या दरात किंचित घसरण झाली आहे. सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ५०७९५ रुपये आहे. त्यात ३५ रुपयांची घसरण झाली आहे. चांदीचा एक किलोचा भाव ६३५९० रुपये असून त्यात १०१ रुपयांची घसरण झाली आहे. सोमवारी कमॉडिटी बाजारात संध्याकाळी ५ वाजता ट्रेडींग सुरु झाले आहे. आत सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण पहायला मिळाली. सध्या सोने ५८६ रुपयांनी स्वस्त झाले असून चांदीच्या भावात एक किलोला १०६२ रुपयांची घसरण झाली होती. मात्र बाजार बंद होताना सोने चांदी सावरले होते. goodreturns.in या वेबसाईटनुसार मंगळवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ४९७६० रुपये आहे. तर २४ कॅरेटचा भाव ५०७६० रुपये आहे.दिल्लीत २२ कॅरेटचा भाव ४९७६० रुपये असून २४ कॅरेटचा भाव ५४२८० रुपये आहे. कोलकात्यात ग्राहकांना २२ कॅरेट सोने खरेदीसाठी ४९०९० रुपये मोजावे लागत आहेत. तर २४ कॅरेटचा भाव ५४४३० रुपये आहे. चेन्नईत २२ कॅरेट सोने प्रती १० ग्रॅमसाठी ४८२२० रुपये आहे. २४ कॅरेटसाठी तो ५२६०० रुपये आहे. जागतिक बाजारात सोने १८९०.४३ डॉलर प्रती औंस स्थिर आहे. चांदीच्या किमतीत मात्र ०.१ टक्के घसरण झाली आहे. चांदीचा भाव प्रती औंस २४.७४ डॉलर आहे. अमेरिकी डॉलरचे इतर चलनांच्या तुलनेत अवमूल्यन झाल्याने सोन्याच्या किमतींना आधार मिळाला असल्याचे चलन बाजार विश्लेषकांचे म्हणणे आहे. डॉलर इंडेक्स ०.१७ टक्क्यांनी कमी होऊन ९२.४७७ वर स्थिरावला आहे. यामुळे इतर चलनातील साठेबाजांसाठी सोने बाळगणे आर्थिकदृष्ट्या स्वस्त झाले. अमेरीका आणि युरोपात करोना रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे गुंतवणूकदार वळाले आहेत. मॉर्डन या कंपनीने करोना प्रतिबंधात्मक लस ९४.५ टक्के परिणामकारक असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे जागतिक कमॉडिटी बाजारात सोने १.३ टक्क्यांनी स्वस्त झाले होते.