'पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रातील स्वपक्षीयांना एवढं सांगितलं तरी...' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, November 22, 2020

'पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रातील स्वपक्षीयांना एवढं सांगितलं तरी...'

https://ift.tt/3nLV6Gd
मुंबईः राजधानी दिल्लीत सध्या प्रदुषण आणि करोनाची लाट आहे. मुंबईतही करोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर, राज्यातील विविध मुद्द्यांवरुन भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष पाहायला मिळतोय. या सगळ्या घडामोडींवर शिवसेना नेते यांनी टीकेची झोड उठवली आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्यांनी राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यातील प्रार्थनास्थळे उघडण्याचा मुद्दा, छठपुजेला परवानगी अशा विविध मुद्द्यांवरुन भाजपनं सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. या सगळ्या प्रकरणावर संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक या सदरातून भाष्य केलं आहे. तसंच, महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांना सल्लाही दिला आहे. 'दिल्लीत करोनाची दुसरी लाट आली आहे, पण ही तिसरी लाट आहे असं जाणाकार सांगतात. बुधवारी मी दिल्लीत होतो. त्या चोवीस तासांत करोनाचा स्फोट झालेला मी पाहिला आहे. एका दिवसात साधारण साडेसात हजार करोना रुग्ण झाले. त्या चोवीस तासांत १५० म्हणजे सर्वाधिक मृत्यू झाले हे सर्व का घडले, तर दिल्ली सरकारने सर्व काही उघडण्याची घाई केली. त्या फाजिल आत्मविश्वासातून हे संकट वाढले. राजधानीत कोरोना संक्रमण वाढत असताना सरकार काय करत होते? ज्यांनी आपल्या आप्तांना या दहा दिवसांत गमावले त्यांना सरकार काय जवाब देणार? असा सवाल आता दिल्ली हायकोर्टाने केजरीवाल सरकारला विचारला.' 'काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल हे गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाशी झुंजत आहेत. त्यांचा समाचार घेण्यासाठी दिल्लीतील मेदांता हॉस्पिटलात पोहोचलो. पटेल हे अतिदक्षता विभागात आहेत. त्यांच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावरचा तणाव मला स्पष्ट जाणवला. कोरोना कोणालाही सोडत नाही व तुम्ही कितीही मोठे असलात तरी कोणतीही शक्ती तुम्हाला वाचवत नाही. दिल्लीत पुन्हा ‘लॉक डाऊन’ची तयारी सुरू आहे. बाजार, दुकाने, सार्वजनिक स्थळे व प्रार्थनास्थळे पुन्हा बंद केली जातील. हे का घडले याचा विचार महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी करायला हवा,' असा टोला त्यांनी लगावला आहे. महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांनी सध्या ज्या भूमिका घेतल्या आहेत त्या विरोधासाठी विरोध करण्याच्या आहेत. पाच वर्षे ज्यांनी राज्याची निरंकुश सत्ता भोगली त्यांनी किमान नीतिनियमांचे भान ठेवायला हवे. मुंबईत छठपूजेला परवानगी द्यावी या मागणीसाठी भाजपवाले आंदोलन करीत होते. बिहारची निवडणूक भाजपने जिंकली हे खरे, पण मुंबईतील बिहारी जनतेस छठपूजेच्या वादात ओढण्याचे कारण नाही, असंही संजय राऊत म्हणाले आहेत. मंदिरांचे राजकारण महाराष्ट्रात मंदिरे उघडा यासाठी जो गोंधळ घातला तो राजकीय होता. मंदिरे उघडण्याचा निर्णय घेत नाही, त्यामुळे ‘ठाकरे सरकार’ हिंदुत्वाच्या विरोधी असल्याची बोंब ठोकणे हे सरळ सरळ ढोंग आहे. हरयाणात भाजपचे सरकार आहे. तेथे शाळा उघडण्याचा निर्णय घेतला, पण ७२ तासांत पाचशेहून जास्त विद्यार्थी व शिक्षक कोरोनाबाधित झाले. कोरोनाच्या लढाईशी जे हिंदुत्ववादाचा संबंध जोडत आहेत ते जनतेचे शत्रू आहेत. दिल्लीत पुन्हा लॉकडाऊन करण्याचा विचार सुरू आहे. महाराष्ट्रावर ही वेळ येऊ नये. भाजपसारख्या पक्षांची तशी इच्छा असेल तर ते राज्याचे दुर्दैव! पुन्हा देशाचे पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहा या विषयावर जाहीरपणे काहीच बोलायला तयार नाहीत. देशाच्या राजधानीत कोरोनाची लाट उसळली आहे व तेथे भाजपचे सरकार नाही म्हणून अक्षम्य दुर्लक्ष करायचे हे योग्य नाही, अशी टीका त्यांनी केली आहे. संजय राऊत यांच्या सदरातील महत्त्वाचे मुद्दे >> छठपूजा प्रामुख्याने बिहार किंवा उत्तरेत केली जाते. मुंबईत हे लोण तसे अलीकडे आले. मुंबईत छठ पूजेला सार्वजनिक ठिकाणी परवानगी द्यावी अशी मागणी भाजपचे नेते करतात. पण गुजरात, हरयाणा, मध्य प्रदेशातील भाजप सरकारने सार्वजनिक ठिकाणी छठ पूजेची परवानगी नाकारली हे महाराष्ट्रातील कसे विसरतात? >> मुंबईतील भाजप नेते जुहू चौपाटीवर छठपूजेसाठी परवानगी मागत होते ते कोणत्या आधारावर? मुंबईत पुन्हा कोरोना वाढवून सरकारला बदनाम करायचे हे राजकारण त्यामागे आहे. मात्र त्यात लोकांचे जीव जातात याचे भान ठेवले जात नाही. हे क्रौर्य आणि अमानुषता आहे. >> बिहार जिंकले, आता प. बंगाल जिंकायचे असे भाजपने ठरवले असेल तर तो त्यांचा प्रश्न, पण खरे संकट कोरोना, घसरलेल्या अर्थव्यवस्थेचे. त्यावर कधी विजय मिळवणार? >> दिल्लीवर कोरोनाने हल्ला केला आहे. त्याच दिल्लीत राष्ट्रपती व पंतप्रधान मोदी राहतात. त्यांच्या डोळ्यांसमोर लोकांचे बळी जात आहेत. एखाद्या राष्ट्रीय संदेशात स्वपक्षीयांना कोरोनाचे राजकारण थांबवा, एवढे पंतप्रधानांनी सांगितले तरी मोठी राष्ट्रसेवा घडेल.