मुंबई: करोनाची साथ गेल्याचा समज करून घेत बेफिकिरपणे वागणाऱ्या मुंबईकरांसाठी मुंबईचे महापालिका आयुक्त आय. एस. चहल यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. कोविडमुळं दिल्लीत निर्माण झालेल्या भयंकर परिस्थितीचं वर्णन करणारा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ शेअर करतानाच, 'स्वत:ला जपा, काळजी घ्या,' असं कळकळीचं आवाहन चहल यांनी मुंबईकरांना केलं आहे. () कोविडमुळं मृत्यू झालेल्या रुग्णांच्या मृतदेहांची विल्हेवाट लावणाऱ्या शहीद भगतसिंह ट्रस्टच्या दोन स्वयंसेवकांचा व्हिडिओ चहल यांनी शेअर केला आहे. दिवाळीनंतरचा हा व्हिडिओ आहे. दिवाळीच्या नंतर दिल्लीतील करोनाची स्थिती अत्यंत गंभीर झाली असल्याचं हे दोन स्वयंसेवक सांगत आहेत. उपचारांसाठी लोकांना बेड मिळत नाहीत. काही महिन्यांपूर्वी इटलीमध्ये जी स्थिती होती, ती स्थिती आज दिल्लीत आहे. मृतांचे केवळ रुग्णालयातील आकडे बाहेर येत आहेत, पण घरात क्वारंटाइन असलेल्यांपैकी अनेकांचे बळी गेले आहेत, असं हे स्वयंसेवक सांगताना दिसत आहेत. वाचा: याच व्हिडिओचा संदर्भ देत चहल यांनी मुंबईकरांना सावधानतेचा इशारा दिला आहे. 'दिल्लीतील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत आहे. त्यामुळं आपण खूप काळजी घेतली पाहिजे. स्वत:ला सुरक्षित ठेवलं पाहिजे. 'नो मास्क, नो एन्ट्री' हे तत्वच आपल्या सर्वांना कोविडपासून वाचवू शकतं. त्यामुळं मास्क वापरण्याचं महत्त्व आपण सर्व नागरिकांना पटवून देऊ करूया आणि आपल्या कुटुंबीयांचा जीव वाचवूया', असं आवाहन चहल यांनी केलं आहे. आपण हे करू शकतो, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. वाचा: करोनाची दुसरी लाट कधीही, कुठेही धडकण्याची भीती वर्तवली जात आहे. त्यामुळं मुंबई महापालिका दक्ष असून सर्व प्रकारची काळजी घेतली जात आहे. २३ नोव्हेंबरपासून नववीच्या पुढील वर्ग सुरू होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची तपासणी केली जात आहे. मास्क वापरण्याबाबत सातत्यानं जनजागृती केली जात आहे.