
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाने १५ ऑक्टोबरपासून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये द्वितीय वर्षाच्या, तसेच १ जानेवारीपासून प्रथम वर्षाच्या प्रशिक्षणास सुरुवात केली आहे. मात्र आयटीआयचे शिक्षक आणि प्रशिक्षणार्थी यांना लोकल प्रवास करण्यास परवानगी मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ लागले आहे. लोकलने प्रवास केल्यास विद्यार्थ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याने पालक, शिक्षण आणि विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे आयटीआयचे आणि शिक्षकांना लोकल प्रवासाची परवानगी द्यावी, अशी मागणी या संघटनेने केली आहे. राज्यातील आयटीआय १५ ऑक्टोबरपासून सुरू झाले. मात्र अद्यापही रेल्वेने आयटीआयच्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थीना लोकल प्रवासाला मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे प्रशिक्षणार्थी आणि शिक्षकांचे प्रवासादरम्यान हाल होत आहेत. राज्यातील आयटीआय केंद्र सरकारच्या निर्णयानुसार चालविण्यात येत असल्याने वार्षिक वेळापत्रक पाळणे संस्थांना बंधनकारक आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना दिवसातील पाच तास प्रॅक्टिकल आणि दोन तास थेअरीचे शिक्षण देणे आवश्यक आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना संस्थेत येणे गरजेचे असते. मुंबई महानगर क्षेत्रातील आयटीआयमध्ये दूरवरून विद्यार्थी येतात. या विद्यार्थ्यांना लोकल प्रवासाशिवाय इतर प्रवासाची सुविधा उपलब्ध नाही. खासगी वाहनाने प्रवास केल्यास विद्यार्थी आणि शिक्षकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. लोकलने प्रवास केल्यास विद्यार्थ्यांवर तिकीट तपासणीसांकडून दंडात्मक कारवाई होत आहे. तर पोलिसांकडूनही विद्यार्थ्यांना दमबाजी होत असल्याने गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणापासून दूर राहण्याची वेळ आली आहे. यामुळे प्रशिक्षणार्थी, शिक्षकांना लोकल प्रवासाची मुभा नसल्याने शिक्षकांची गैरसोय होत आहे. विद्यार्थीचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने सरकारने याप्रश्नी लक्ष घालून विद्यार्थी आणि शिक्षकांना लोकल प्रवासाची सोय करून द्यावी, अशी मागणी संघटनेचे सचिव देवेंद्र पाटणे यांनी केली आहे.