नवी : दिल्लीतील फॉरेन पोस्ट ऑफिसातातून (एफपीओ) ड्रग्जची तस्करी करणाऱ्यांचा पर्दाफाश करण्यात आला आहे. आयटीओ परिसरातील ऑस्ट्रेलियासाठी बुक करण्यात आलेल्या लेहंग्यांचे पार्सल पकडण्यात आले आहे. झडती घेतली असता, लेहंग्यात १ कोटी ७० लाख रुपयांचे पार्टी ड्रग्ज आढळून आले. एअर कार्गो कस्टम एक्स्पोर्ट आयुक्तालयाच्या आयुक्त काजल सिंह यांनी सांगितले की, एकूण सात लेहंगे जप्त केले आहेत. नोएडा कार्यालयातून ते दिल्ली एफपीओला पाठवण्यात आले होते. पार्सल बुक करणाऱ्याची माहिती घेतली जात आहे. या लेहंग्यांमध्ये पार्टी ड्रग्ज होते. ड्रग्ज माफियांचे मोठे रॅकेट समोर येण्याची शक्यता आहे. एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, या तस्करीचा संबंध राजस्थानशी जोडला असण्याची शक्यता आहे. हे पार्सल राजस्थानहून नोएडाच्या पत्त्यावर ऑस्ट्रेलियाला पाठवण्यासाठी बुक करण्यात आले होते, अशी माहिती आहे, असेही सांगण्यात आले. सूत्रांच्या माहितीनुसार, ड्रग तस्कर हे एरवी विमानतळावरच पकडले जातात, पण काही तस्कर हे फॉरेन पोस्ट ऑफिसच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात तस्करी करत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या कारवाईत ड्रग जप्त करण्यात आले असले तरी, अन्य वस्तूंचीही तस्करी होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही सूत्रांचे म्हणणे आहे.