
मुंबई : बजेटनंतर तेजीच्या लाटेत स्वार झालेल्या सेन्सेक्स आणि निफ्टीवर सध्या दबाव निर्माण झाला आहे. आज गुरुवारी बाजार उघडताच काही क्षेत्रात विक्री सुरु झाली असून नफेखोरांनी नफावसुली सुरु केली आहे. सध्या सेन्सेक्स २०० अंकांनी घसरला आहे. तर निफ्टी ५० अंकांची घट झाली आहे. अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात भांडवली बाजारात मोठी घसरण झाली होती. नफेखोरांनी केलेल्या जोरदार नफावसुलीने गेल्या आठवड्यात सेन्सेक्स ३००० अंकानी कोसळला होता तर निफ्टीत १००० हून अधिक अंकांची घसरण झाली होती. मात्र बजेटच्या दिवशी दोन्ही निर्देशांक सावरले. सेन्सेक्स आणि निफ्टीत वाढ झाली होती. सेन्सेक्स मंचावरील ३० पैकी १४ शेअर तेजीत आहेत तर उर्वरित १६ शेअरमध्ये घसरण झाली आहे. बजाज फायनान्स, पॉवरग्रीड, अल्ट्राटेक सिमेंट, कोटक महिंद्रा बँक, बजाज फिनसर्व्ह, सन फार्मा, रिलायन्स इंडस्ट्रीज, मारुती, टेक महिंद्रा या शेअरमध्ये घसरण झाली आहे. भारती एअरटेलच्या शेअरमध्ये आज तेजी आहे. भारती एअरटेलचा शेअर १ टक्क्यांनी वधारला आहे. कंपनीला तिसऱ्या तिमाहीत ६०० कोटींचा नफा झाला आहे.आज बँकिंग क्षेत्रात मोठी घसरण झाली आहे. एचडीएफसी बँक, ऍक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, इंडसइंड बँक, एसबीआय या शेअरमध्ये घसरण झाली आहे. भांडवली बाजारात परकीय गुंतवणुकीचा ओघ कायम आहे. डॉलर इंडेक्स आणि कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाली असली तरी त्याचा फारसा परिणाम परकीय गुंतवणूकदारांवर झालेला नाही, असे मत जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे शेअर बाजार विश्लेषक व्ही. के विजयकुमार यांनी सांगितले. बाजाराचे लक्ष आता रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणाकडे लागले असल्याचे त्यांनी सांगितले. आज आशियात मात्र नकारात्मक वातावरण आहे. अमेरिकेत बुधवारी संमिश्र वातावरण होते.