मुंबई: संसर्गाची भयावह स्थिती हाताळण्याच्या मुद्द्यावरून भारतावर जगभरातून टीका होत आहे. जगातील नामांकित वृत्तपत्रांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. प्रख्यात जागतिक व्यंगचित्रकार डेव्हिड रोवे यांनी पंतप्रधान मोदींवर एक जहाल व्यंगचित्र रेखाटलं आहे. यावरून शिवसेनेनं पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. () शिवसेनेनं 'सामना'च्या अग्रलेखातून देशातील करोना स्थितीवर भाष्य केलं आहे. परदेशात भारताबद्दल सध्या काय बोलले जात आहे यावर शिवसेनेनं प्रकाश टाकला आहे. प्रख्यात व्यंगचित्रकार डेव्हिड रोवे यांचं व्यंगचित्रच 'सामना'नं प्रसिद्ध केलंय. एक अगडबंब हत्ती जमिनीवर मरून पडला आहे व त्या मेलेल्या हत्तीवरील अंबारीत मोदी हे माहुताच्या भूमिकेत बसले आहेत. ‘मेलेल्या सरकारी व्यवस्थेचा माहुत’ अशा शीर्षकाचं हे टोकदार व्यंगचित्र ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रात प्रसिद्ध झालं आहे. 'हे व्यंगचित्र देश म्हणून आपली मानहानी करणारे आहे. या मानहानीबद्दल दिल्लीश्वर कोणाला जबाबदार धरणार आहेत?,' असा प्रश्न शिवसेनेनं केला आहे. वाचा: करोनाबाबत अफवा पसरवू नका या मोदींच्या वक्तव्यावर शिवसेनेनं टोला हाणला आहे. 'मुळात अफवा कोण पसरवीत आहेत? मनमोहन सिंग, राहुल गांधी, केजरीवाल, उद्धव ठाकरे, प्रियंका गांधी, ममता बॅनर्जी करोनासंदर्भात अफवा पसरवतात व त्यामुळं देशाची स्थिती गंभीर झाली असं कुणाला वाटत असेल तर देशातील गंभीर स्थितीबाबत जगभरातील प्रसारमाध्यमांनी मांडलेली चिंता समजून घेतली पाहिजे,' असा सल्ला शिवसेनेनं दिला आहे. 'भारतातील करोना परिस्थितीवर चिंता व्यक्त करणाऱ्या भूमिका देशातील अनेक बुद्धिवंत, स्वयंसेवी संस्था, कार्यकर्ते मंडळी ‘ट्वीटर’सारख्या समाजमाध्यमांतून मांडीत असतात. मात्र आता त्यांच्या ‘ट्विट’वर बडगा उगारण्यात आला आहे. ही सर्व ‘ट्विटस्’ हटविण्याचे फर्मान आता सुटले आहे. हे खरे असेल तर हा मुस्कटदाबीचाच प्रकार आहे,' असा संताप शिवसेनेनं व्यक्त केलाय. अर्थात, 'गेल्या काही दिवसांत केंद्र सरकारनं हालचाल सुरू केली आहे. अनेक चांगले निर्णय घेतल्याचंही शिवसेनेनं मान्य केलं आहे. त्यामुळं व्यवस्थेचा हत्ती लवकरच उभा राहील, अशी आशाही शेवटी व्यक्त केली आहे. वाचा: