वॉशिंग्टन: जगात विषाणूचा संसर्ग फैलावत असताना दुसरीकडे अमेरिकेतील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. अमेरिकेत करोना लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींची मास्क वापरापासून सुटका झाली आहे. त्याशिवाय या व्यक्तिंना सोशल डिस्टेसिंगचे पालन करणे अनिवार्य ठरणार नाही. अमेरिकेच्या रोग प्रतिबंधक आणि नियंत्रण केंद्राने (सीडीसी) याची घोषणा केली. अमेरिकेत करोना संसर्गामुळे मास्क वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. अमेरिकेत जगातील सर्वाधिक करोनाबाधित आहेत. करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लसीकरण सुरू आहे. सीडीसीने सांगितले की, करोना लशीचे दोन डोस घेतलेल्या व्यक्ती आता मास्कचा वापर न करता आपली कामे करू शकतात. त्याशिवाय सहा फूट अंतराच्या सोशल डिस्टेंसिगच्या नियमातून सवलत देण्यात आली आहे. मात्र, राज्य, स्थानिक, आदिवासी भाग अथवा संबंधित क्षेत्रातील नियम आणि निर्देशांनुसार ज्या ठिकाणी मास्क वापरणे अनिवार्य आहे, त्या ठिकाणी मास्क वापरावा लागणार आहे. वाचा: वाचा: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी देखील याची माहिती देताना म्हटले की, जर तुम्ही लशीचे दोन्ही डोस घेतले असतील तर मास्क वापराची आवश्यकता राहणार नाही. मास्क वापरा अथवा लसीकरण करून घ्या असा सरळ नियम असल्याचे त्यांनी सांगितले. वाचा: अल्पवयीन गटासाठी लसीकरण करोनाच्या संसर्गाशी दोन हात करत असलेल्या अमेरिकेत लसीकरण वेगाने करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण करण्याच्या दृष्टीने अमेरिकेत आता वय वर्ष १२ ते १५ या वयोगटाचे लसीकरण होणार आहे. अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने फायजरच्या लशीला मंजुरी दिली आहे. अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने १२ ते १५ वर्ष या वयोगटाच्या मुलांसाठी विकसित केलेल्या फायजरच्या लशीला सोमवारी मंजुरी दिली. करोनाविरुद्धच्या लढाईत हा महत्त्वाचा निर्णय असल्याची प्रतिक्रिया एफडीएचे कार्यवाहक आयुक्त जेनेट वुडकॉक यांनी व्यक्त केली.