
वॉशिंग्टन: भारतात कोविशिल्ड लशीच्या दोन डोसमधील कालावधी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयावर टीका होत असताना दुसरीकडे तज्ज्ञांकडून याचे स्वागत करण्यात आले आहे. अमेरिकन सरकारचे मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉ. अँथनी फाउची यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. तुमच्याजवळ पुरेसा लस साठा उपलब्ध नसल्यास अशा स्थितीत पहिल्या आणि दुसऱ्या डोसमधील कालावधी वाढवणे हा योग्य निर्णय आहे. या निर्णयामुळे किमान एक डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या अधिक होईल. डॉ. फाउची यांनी म्हटले की, लशीचा दुसरा डोस घेण्यास उशीर झाल्यास त्याची परिणामकता कमी होईल, याची शक्यता कमीच आहे. गुरुवारी भारतात कोविशिल्ड लशीच्या दोन डोसमधील कालावधी ६ ते ८ आठवड्यांवरून १२ ते १६ आठवडे करण्यात आला आहे. ब्रिटनमध्ये हा कालावधी १२ आठवडे असल्याचे राष्ट्रीय तंत्रज्ञान सल्लागार समूहाने (NTAGI) म्हटले आहे. वाचा: NTAGI ने म्हटले की, ब्रिटनमध्ये हा कालावधी १२ आठवडे असून युरोपीयन युनियनने हा कालावधी न वाढवण्याची सूचना केली आहे. काही संशोधनानुसार, दोन्ही डोस घेण्याच्या कालावधीत अंतर असल्यास त्याचा फायदा अधिक होण्याची शक्यता आहे. लशीचा परिणाम अधिक होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. अमेरिका, पेरू आणि चिलीमध्ये करण्यात आलेल्या चाचणीनुसार, दोन डोसमध्ये चार आठवड्यांहून अधिक अंतर असल्यास दुसरा डोस ७९ टक्क्यांपेक्षा अधिक प्रभावी असतो. वाचा: वाचा: दरम्यान, भारतात करोनाच्या नवीन रुग्णांची संख्या वाढत असल्याने स्थिती बिकट बनली आहे. दुसरीकडे अनेक राज्यांमध्ये लसीचा तुटवडा आहे. यामुळे १८ ते ४४ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरणही खोळंबले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. देशात पुढच्या आठवड्यापासून रशियाची स्पुतनिक लस ( ) बाजारात उपलब्ध होणार आहे. पुढील आठवड्यापासून नागरिकांना रशियाच्या स्पुतनिक लसीचा डोस घेता येऊ शकेल. या लसीचे जुलैपासून भारतात उत्पादन सुरू होईल. स्पुतनिक लस भारतात दाखल झाली आहे. पुढच्या आठवड्यात ही लस बाजारात उपलब्ध होईल. रशियाच्या या लसीची मर्यादित प्रमाणात विक्री पुढच्या आठवड्यापासून सुरू होईल, अशी माहिती नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी दिली.