
मुंबई : मागील दोन महिन्यांमध्ये झालेल्या दरवाढीने पेट्रोलने अनेक शहरांमध्ये शंभरी ओलांडली आहे. पाठोपाठ डिझेलदेखील शंभरीच्या उंबरठ्यावर आहे. इंधन दरवाढ नजीकच्या काळात महागाईचा भडका उडण्यास कारणीभूत ठरणार आहे. दरम्यान, आज शनिवारी पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दर जैसे थे ठेवले. देशभरात आज शनिवारी पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल झालेला नाही. याआधी काल शुक्रवारी पेट्रोल २७ पैसे आणि डिझेलमध्ये २८ पैशांनी महागले होते. आज मुंबईत पेट्रोल १०३ रुपयांवर स्थिर आहे. एक दिवसआड पेट्रोलियम कंपन्या दरवाढीचा शॉक देत आहेत. आज शनिवारी मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०३.०८ रुपये इतका वाढला आहे. दिल्लीत पेट्रोल ९६.९३ रुपये झाला आहे. चेन्नईत पेट्रोलसाठी ९८.१४ रुपये भाव आहे. तर कोलकात्यात एक लीटर पेट्रोल ९६.८४ रुपये आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव १०५ रुपयांवर गेला आहे. तर प्रीमियम पेट्रोल १०८.६७ रुपये झाले आहे. भोपाळमध्ये डिझेलचा भाव ९६.३५ रुपये आहे. देशात सर्वात महाग डिझेल भोपाळमध्ये मिळत आहे. मुंबईत ९५.१४ रुपये झाला आहे. दिल्लीत डिझेल ८७.६९ रुपये आहे. चेन्नईत ९२.३१ रुपये आणि कोलकात्यात ९०.५४ रुपये डिझेलचा भाव आहे. झपाट्याने झालेल्या लसीकरणानंतर यूएस तेल साठ्यातील कमी आणि मुख्य अर्थव्यवस्था पुन्हा सुरू झाल्याने तेल बाजारासाठी अनुकूल आऊटलुक उभा झाला आहे. यूएस फेडरल रिझर्व्हचे धोरण, आगामी महिन्यांमध्ये यूएस आर्थिक दृष्टीकोनात बदल करण्याचा सल्ला या घडामोडींचा परिणाम झाला आहे. इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीने पेट्रोलियम निर्यात करणार्या देशांच्या संघटनेला (ओपेक) आणि सहयोगींना (ज्यांना ओपेक + देखील म्हणतात) वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी उत्पादन वाढवण्याची अपील केली. जागतिक कमॉडिटी बाजारात शुक्रवारी पुन्हा एकदा कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली. ब्रेंट क्रूडचा भाव ०.४३ डॉलरने वधारला आणि ७३.५१ डॉलर झाला. डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव ०.६० डॉलरने वधारून ७१.६४ डॉलर झाला.