करोनाच्या नव्या स्ट्रेनचा होणार शास्त्रीय अभ्यास; महत्त्वाची माहिती येणार समोर? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, June 30, 2021

करोनाच्या नव्या स्ट्रेनचा होणार शास्त्रीय अभ्यास; महत्त्वाची माहिती येणार समोर?

https://ift.tt/3qDeloa
: राज्यातील ७ जिल्ह्यांमध्ये डेल्टा प्लस या करोनाच्या नव्या स्ट्रेनचे ( New Strain) २१ रुग्ण सापडले आहेत. याचा आधार घेऊन राज्यातल्या विविध भागांत करोनाच्या विषाणूत म्युटेशन झाल्याची शक्यता वैद्यकीय संशोधकांनी व्यक्त केली आहे. त्याला भारतीय वैद्यकीय चिकित्सा अनुसंधान परिषदेने (आयसीएमआर) देखील दुजोरा दिला आहे. या पार्श्वभूमीवर विदर्भातील स्ट्रेनचा शास्त्रीय अभ्यास करण्यासाठी नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाने गेल्या सात दिवसांत गोळा केलेले १०० नमुने पुण्यातील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत. पुण्यातील एनआयव्हीमधील विषाणूचे अभ्यासक या नमुन्यांमधील विषाणूच्या जनुकीय साखळीचा अभ्यास करणार आहे. जिनोम फ्रिक्वेसिंगच्या या अभ्यासाचा अहवाल प्राप्त होण्यास आणखी ५ ते ७ दिवसांची वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे या जनुकीय साखळीच्या संशोधनातून काय निष्कर्ष निघतात याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलं आहे. करोनाच्या स्ट्रेनचा जनुकीय अभ्यास करण्यासाठी व्हायरॉजिच्या प्रयोगशाळेकडे प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात नमुने पुण्याला रवाना करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे उपराजधानीत धुमाकूळ घातलेल्या कोव्हिडच्या दोन्ही लाटे दरम्यान विदर्भातील नमुन्यांमध्ये विषाणूचे पाच नवीन स्ट्रेन आढळले होते. यापूर्वी मेयोने पाठविलेल्या नमुन्यांमधून हे स्ट्रेन आढळले होते. त्यावेळी करोनाच्या विषाणूत प्रथमच दुहेरी म्यूटेशन झाल्याचेही संशोधनातून पुढे आले होते. त्यामुळे आता नव्याने मेडिकलमधून जिनोम फ्रिक्वेंसिंगसाठी पाठविलेल्या १०० नमुन्यांचा अहवाल काय येतो, याकडे विदर्भाचे लक्ष लागले आहे. जनुकीय साखळी निदानासाठी पुण्याला रवाना करण्यात आलेल्या नमुन्यांच्या या वृत्ताला मेडिकलमधील सूत्रांनी नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर दुजोरा दिला आहे. दरम्यान, राज्यात डेल्टा प्लस या करोनाच्या नव्या स्ट्रेनचे रुग्ण आढळत असल्याने पुन्हा एकदा लॉकडाऊनची चर्चा सुरू झाली. त्यामुळे आगामी काळात या विषाणूचा अटकाव करण्यास शासन-प्रशासनाला कसं यश येणार, हे पाहावं लागेल.