कोल्हापूरः दक्षिण महाराष्ट्रातील सुमारे आठशे गावांनी ‘एक गाव, एक गणपती’चा विधायक उपक्रम राबविला. यामध्ये सातारा जिल्ह्याने आघाडी घेतली असून सांगली जिल्ह्यातील ६४ गावांनी उत्सवाला फाटा देत ती रक्कम विधायककामासाठी देण्याचा कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. करोना आणि महापूरामुळे या भागात मोठा फटका बसला. त्या पार्श्वभूमीवर गावांनी एकत्र येत विधायक उपक्रमाला बळ देण्याचा संकल्प यशस्वी केला. गेल्यावर्षी करोनाचा संसर्ग सुरू झाला. त्यामुळे गतवर्षी गणेशोत्सवावर अनेक निर्बंध घालण्यात आले. वर्षानंतरही परिस्थिती सुधारली नाही. दुसऱ्या लाटेने मोठा दणका दिला. या पार्श्वभूमूमीवर शुक्रवारी गणरायाचे साधेपणाने मात्र उत्साहात आगमन झाले. नेहमीसारखी जंगी मिरवणूक, वाद्यांचा कडकडाट, विद्युत रोषणाई यंदा दिसली नाही. करोना संसर्गाचा विळखा दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तीनही जिल्हाला यंदा अधिक बसला. राज्यातील बहुतांशी शहरात हा विळखा लवकर सैल झाला. मात्र, दक्षिण महाराष्ट्रात आजही रोज दोनशे ते तीनशेवर बाधित आढळत आहेत. बारा हजारावर लोकांचा करोनाने बळी घेतला आहे. पाच लाखावर लोकांना करोनाचा दणका बसला. या सर्व पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याची मानसिकता तयार झाली. पुरोगामी चळवळीला ताकद देण्यासाठी दरवर्षी अनेक गावात ‘’ हा उपक्रम राबविला जातो. पोलिस प्रशासन यासाठी अधिक प्रयत्न करते. यंदाही त्यांच्या प्रयत्नाला चांगला प्रतिसाद मिळाला. यंदा दक्षिण महाराष्ट्रातील ७५३ गावांनी ‘एक गाव एक गणपती’ हा उपक्रम राबविला आहे. यामुळे या गावांत एकाच गणेशमूर्तीची प्रतिष्ठापणा करण्यात आली आहे. यामध्ये सातारा जिल्ह्याने आघाडी घेतली. या जिल्ह्यातील ४२४ गावे या उपक्रमात सहभागी झाली आहेत. त्या पाठोपाठ कोल्हापूर जिल्ह्यातील २९२ गावांचा समावेश आहे. गणेशोत्सव साधेपणाने साजरा करत वाचवलेली रक्कम विधायक कामांना वापरण्याचे नियोजन आहे. कोविड सेंटर, करोना रूग्णांना तसेच महापूराचा फटका बसलेल्या नागरिकांना ही मदत देण्यात येणार आहे. सांगलीचे पाऊल पुढे जुलै महिन्यात आलेल्या महापुराचा फटका सांगली जिल्ह्याला बसला. येथे हजार कोटीपेक्षा अधिक नुकसान झाले. करोनाचा विळख्याने जिल्ह्यातील अनेक कुटुंबाचे आर्थिक गणित बिघडले. या पार्श्वभूमूमीवर जिल्ह्यातील ६४ गावांनी गणेशोत्सवच साजरा न करण्याचा निर्णय घेतला. उत्सवाचा खर्च टाळून ती रक्कम विधायक कामाला देण्याचे कौतुकास्पद पाऊल या गावांनी उचलले आहे. एक गाव, एक गणपती सातारा ४२४ कोल्हापूर २९२ सांगली ४७