श्रीनगरः जम्मू -काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. कुलगाममध्ये लश्कर-ए-तोयबाचा जिल्हा कमांडर गुलजार अहमद रेशी याच्यासह दोन दहशतवाद्यांचा लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईत खात्मा करण्यात आला, अशी माहिती काश्मीर झोनचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी दिली. दोन्ही दहशतवादी बिहारच्या दोन गरीब मजुरांच्या हत्येत सामील होते. १७ ऑक्टोबरला वानपोहमध्ये दहशतवाद्यांनी दोन्ही कामगारांची हत्या केली होती. काही दिवसांपूर्वी सुरक्षा दलाने शोपियान जिल्ह्यात लश्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना चकमकीत ठार केले होते. या कारवाईत लष्कराचा एक जवान शहीद झाला. या चकमकीत इतर दोन सुरक्षा कर्मचारी जखमी झाले होते. ठार दहशतवाद्यांपैकी एक उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या एका व्यक्तीच्या नुकत्याच झालेल्या हत्येत सामील होता, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाने शोपियान जिल्ह्यातील दरगड भागाला वेढा घातला आणि शोधमोहीम सुरू केली. यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलाच्या जवानांनीही त्यांना प्रत्युत्तर दिले. या कारवाईत लश्कर-ए-तोयबाशी संबंधित असलेल्या 'द रेझिस्टन्स फ्रंट' (TRF) चे दोन दहशतवादी ठार झाले होते. जम्मू -काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये वाढ झाली आहे. दहशतवाद्यांनी नागरिकांना हल्ल्यांचे लक्ष्य केले आहे. याच महिन्यात दहशतवाद्यांनी खोऱ्याच्या वेगवेगळ्या भागात दोन शिक्षक आणि एक औषध विक्रेत्यासह एकूण ११ जणांची हत्या केली. त्याचबरोबर सुरक्षा दलांनी दोन आठवड्यांत आतापर्यंत १७ दहशतवाद्यांना ठार केले आहे.