
कोल्हापूर: जिल्ह्यातील तब्बल ५८० गावात झालेल्या ग्रामसभेत यंदा फटाके न वाजवता फटाकेमुक्त पर्यावरण पूरक दिवाळी साजरा करण्याचा ठराव करण्यात आला. ग्रामस्थांनी घेतलेल्या या कौतुकास्पद निर्णयामुळे जिल्ह्यात यंदाची दिवाळी पर्यावरण पूरक होण्याची चिन्हे आहेत. दरवर्षी दिवाळीला मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी होते. अनेकदा मोठ्या आवाजाच्या फटाक्यांना बंदी असूनही ग्रामीण भागात असे फटाके मोठ्या प्रमाणात वाजवले जातात. पोलीस किंवा अन्य प्रशासकीय यंत्रणा कारवाई करत नसल्यामुळे आतषबाजी जोरात होते. यामुळे मात्र ध्वनी बरोबरच पर्यावरणाचेही प्रदूषण होते. या सर्व पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा परिषदेने यंदा फटाकेमुक्त दिवाळी साजरा करण्यासाठी पावले उचलली आहेत. वाचा: याचाच एक भाग म्हणून प्रत्येक ग्रामसभेत फटाकेमुक्त दिवाळीचा ठराव करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेने केली होती. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी यामध्ये पुढाकार घेतला. त्यांच्या आवाहनानुसार जिल्ह्यातील ५८० गावातील सभेत फटाकेमुक्त दिवाळीचा ठराव करण्यात आला आहे. या ठरावाची अंमलबजावणी होण्यासाठी सरपंच व ग्रासेवकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे यंदाची दिवाळी जिल्ह्यात पर्यावरण पूरक होण्याची शक्यता आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चव्हाण यांनी सांगितले की, ठरावाच्या माध्यमातून किमान सकारात्मक विचार करण्यास ग्रामस्थ तयार झाले ही चांगली बाब आहे. जिल्ह्यात १०२५ ग्रामपंचायती आहेत. यातील ५८० गावांनी फटाकेमुक्त दिवाळी साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. उर्वरित ४४५ गावांनी देखील हा निर्णय घ्यावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. वाचा: