: जिल्हा परिषदेच्या अभियंत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास खोकडपूरा भागातील वरद टॉवर येथे घडली. अविनाश भाऊसाहेब हांडे (५३, रा. वरद टॉवर, शिवाजी हायस्कूल जवळ, खोकडपूरा) असं आत्महत्या केलेल्या अभियंत्याचं नाव आहे. अविनाश हांडे हे जिल्हा परिषदेत अभियंता म्हणून नोकरीला होते. त्यांची गेल्यावर्षी चंद्रपूर येथे डेप्युटशनवर बदली झाली होती. त्यांचं अधून-मधून औरंगाबादला येणं-जाणं असायचं. दसऱ्याच्या निमित्ताने ते चंद्रपूरहून घरी आले होते. बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास त्यांनी खोलीतील छताच्या हुकाला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला. हा प्रकार कुटुंबियांच्या लक्षात येताच अविनाश हांडे यांना बेशुद्धावस्थेत तात्काळ घाटीत दाखल करण्यात आलं. मात्र, सकाळी पावणे दहाच्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. दरम्यान, हांडे यांच्या आत्महत्येचं कारण मात्र अद्याप समजू शकलं नाही. त्यांच्या अकस्मात मृत्यूची नोंद क्रांती चौक पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.