
: इंडियन प्रिमिअर लीग () क्रिकेट मॅचवर सट्टा लावणाऱ्या सहा सट्टेबाजांच्या सिटी चौक पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. ही कारवाई बुधवारी (२९ सप्टेंबर) रात्री पावणे दहाच्या सुमारास सिटी चौक भागातील पोस्ट ऑफिससमोर करण्यात आली. आरोपींकडून पोलिसांनी मोबाईलसह ८९ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सिटी चौक ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी परिसरातील अवैध धंद्यावर कारवाईसाठी सहायक पोलीस निरीक्षक सय्यद यांच्या पथकाला सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गस्त घालत असताना सय्यद यांना पोस्ट ऑफिससमोर, जुनाबाजार, मेमन इंटरप्राईस येथील एका दुकानासमोर ड्रीम इलेव्हन टी-२० क्रिकेट मॅचवर ऑनलाईन अॅप्लिकेशनद्वारे सट्टा घेतला जात असल्याची माहिती मिळाली. पोलीस निरीक्षक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सय्यद यांच्या पथकाने रात्री पावणे दहाच्या सुमारास सट्टेबाजांवर छापा मारला. यावेळी महम्मद यासेर महम्मद याकुब, शेख आसेफ शेख रहीम यांना अटक केली, तर रात्री सव्वा बाराच्या सुमारास फ्लॅट क्र. ७,आयबीआय बिल्डींग सातारा परिसरातून महमंद यासेर महमंद याकुब, शेख आसेफ शेख रहीम, तरबेज खान करीम खान, शेख अली उर्फ अलीम पिता शेख महेमुद, मनोज हिरालाल परदेशी, शेख मतीन शेख महेमुद यांना अटक केली. भोकरदन येथील जुबेर शहा याच्या सांगण्यावरून सट्टा घेतला जात असल्याचं पोलिसांना अटकेतील सट्टेबाजांनी सांगितलं आहे. दरम्यान, ही कारवाई पोलीस निरीक्षक अशोक गिरी, अशोक भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सय्यद मोहसीन अली, पोलीस नाईक संजय नंद, संदीप तायडे, शेख गफ्फार, रोहीदास खैरनार, देशराज मोरे, अभिजित गायकवाड, पुजा आढाव यांच्या पथकाने केली.