पणजीः गोव्यात भाजपची पुन्हा सत्ता येण्याची शक्यता आहे. पुढच्या वर्षी गोव्याची विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत तृणमूल काँग्रेस पहिल्यांदाच मैदानात उतरणार आहे. तसंच आम आदमी पार्टीनेही जोरदार तयारी केली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रातील आणि गोव्यातील सत्ताधारी भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठीची असणार आहे. विशेष म्हणजे भाजपने गोव्याचे प्रभारी म्हणून महाराष्ट्राची माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना जबाबदारी दिली आहे. आता निवडणूकपूर्व सर्वे आला आहे. यात भाजपला दिलासा देणारी बातमी आहे. गोवा विधानसभा निवडणुकीपूर्वी ABP C-Voter 2022 Election Survey समोर आला आहे. यात गोव्यातील जनतेच्या मनात काय आहे? याचा अंदाज घेण्यात आला आहे. गोव्यात विधानसभेच्या एकूण ४० जागा आहेत. सर्वोत सहभागी असलेल्या नागरिकांनी सर्वाधिक ३६ टक्के पसंती भाजपला दिली आहे. तर काँग्रेसला १९ टक्के, आम आदमी पार्टीला २४ टक्के आणि इतर पक्षांना २१ टक्के मतं नोंदवली आहेत. गोव्याच्या आगामी निवडणुकीत भाजपला एकूण ४० जागांपैकी १९ ते २३ जागा मिळतील, असा अंदाज आहे. तर काँग्रेसला २ ते ६, आपला ३ ते ७ आणि इतर पक्षांना ८ ते १२ जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसंच गोव्यातील ३० टक्के नागरिकांनी विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना पुन्हा मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली आहे. आम आदमी पक्षाने मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराची घोषणा केलेली नाही. पण गोव्यात सरकार आले तर मुख्यमंत्री भंडारी समाजाचे आणि उपमुख्यमंत्री ख्रिश्चन धर्माचे असतील, असं मनीष सिसोदिया यांनी म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर १९ टक्के नागरिक आम आदमी पक्षाच्या उमेदवाराला मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रताप सिंह राणे यांचे पुत्र आणि भाजप नेते विश्वजीत राणे यांना १५ टक्के नागरिकांनी मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली आहे.