
रायगड : माजी आमदार सुरेश लाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर ११ एप्रिलपासून जिल्हाध्यक्ष पद रिक्त आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षाची मोठी ताकद असल्याने या पदावर वर्णी लागावी यासाठी इच्छुकांची मोठी यादी आहे. जिल्हाध्यक्ष पदासाठी अनेक नावांची चर्चा असून जिल्हाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागतेय याची उत्सुकता आहे. माजी आमदार सुरेश लाड यांनी प्रांताध्यक्ष जयंत पाटील तीन दिवसांच्या रायगड जिल्हा दौर्यावर असताना अचानक राजीनामा दिल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती. मधल्या काळात सुरेश लाड नॉट रिचेबल होते. ते भाजपात जातील अशाही चर्चा होत्या. मात्र, खासदार सुनील तटकरे यांनी यशस्वी मध्यस्ती करत सुरेश लाड यांची नाराजी दूर केल्याने कार्यकर्त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. आपण पक्षात पुन्हा पूर्वीसारखेच कार्यरत होणार असलो तरी जिल्हाध्यक्ष पदावर राहणार नसल्याचे सुरेश लाड यांनी अलिबाग येथील बैठकीत जाहीर केले होते. सुरेश लाड यांनी जिल्हाध्यक्ष पद सोडल्याने लाड यांच्या इतका ताकदीचा नेता जिल्हाध्यक्ष म्हणून पक्षाला शोधावा लागणार आहे. दक्षिण रायगडमध्ये खा. सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे, आ. अनिकेत तटकरे अशी मोठी ताकद असल्याने पक्षाचे जिल्हाध्यक्षपद उत्तर रायगडमध्येच राहण्याची शक्यता आहे. उरणचे प्रशांत पाटील यांचे नाव जिल्हाध्यक्षपदासाठी आघाडीवर आहे. माजी जिल्हाध्यक्ष दत्तात्रेय मसुरकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे, प्रदेश सरचिटणीस हनुमंत पिंगळे, खालापूर तालुकाध्यक्ष नरेश पाटील यांच्याही नावाची चर्चा आहे. विद्यमान कार्याध्यक्ष मधुकर पाटील यांचेही नाव चर्चेत आहे. जिल्हायुवक अध्यक्ष अंकित साखरे, महिलाध्यक्षा उमा मुंढे, विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रसाद पाटील अशी पक्षाची तीन महत्वाची पद खालापूर तालुक्यात असल्याने उत्तर रायगडचा विचार झाल्यास उरणचे प्रशांत पाटील आणि कर्जतचे सुधाकर घारे यांना संधी मिळू शकते. खासदार सुनील तटकरे याबाबत निर्णय घेणार असले तरी माजी आमदार सुरेश लाड यांना विश्वासात घेतले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे रोहाच्या मधुकर पाटील यांच्या गळ्यात जिल्हाध्यक्ष पदाची माळ पडते की उरण-कर्जतला संधी मिळते. याकडे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.