
नागपुरात फडणवीसांच्या भूमिकाबदलाची चर्चा म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर: 'मुख्यमंत्री... मंत्रिमंडळात कुठलेही पद घेणार नाही... आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ...' या काही तासांच्या नाट्यमय घडामोडीत देवेंद्र फडणवीस यांच्या नव्या राजकीय प्रवासामागे नेमका गेम काय, असा प्रश्न कार्यकर्त्यांसह राजकीय वर्तुळाला पडला. या चढ-उतारामुळे संघभूमीसह विदर्भातील भाजप कार्यकर्ते व समर्थकांमध्ये नैराश्य आले. उत्साहावर पाणी फेरले गेले. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देताच देवेंद्र फडणवीस यांचे नाव समोर आले. उपमुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे विराजमान होतील, असेही मानले जात होते. पण, मंगळवारी दुपारी चार वाजता फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे यांचे नाव जाहीर केले. इतकेच नव्हे तर, मंत्रिमंडळात राहणार नाही, असेही स्पष्ट केले. त्यांची ही घोषणा समाजमाध्यमात बरीच गाजली. सर्वत्र सकारात्मक प्रतिक्रिया उमटली. मात्र, हा आनंद औटघटकेचा ठरला. पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे सायंकाळी आलेले ट्वीट व त्या पाठोपाठ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही ट्वीट करून फडणवीस उपमुख्यमंत्री होणार असल्याचे जाहीर केल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह मावळला. वाचाः देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यास विदर्भाच्या विकासाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. सिंचन, शेतकऱ्यांचे प्रश्न, आरोग्य, शिक्षण, मिहान, विमानतळाचा विकास असे अनेक प्रश्न निकाली निघतील, असा विश्वास व्यक्त होऊ लागला होता. उत्साही वातावरण तयार झाले होते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असा विश्वास असणारे नागपूर-विदर्भासह राज्याच्या अन्य भागातून मोठ्या प्रमाणात समर्थक मुंबईला गेले होते. त्यांच्या पदरी निराशा आली. दिल्लीत नेमके काय झाले, फडणवीस यांनी मंत्रिपद न स्वीकारण्यबाबत कुणाशी चर्चा करून निर्णय घेतला, त्यांनी घोषणा करताच दिल्लीत नेत्यांनी समाजमाध्यमातून सूचना कशा केल्या, त्यांचे पंख छाटले की शिंदे सरकारवर अंकुश ठेवण्याची ही खेळी आहे, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. फडणवीस यांचा परत 'गेम' केला का, यापूर्वीही ८० तासांच्या सरकारनंतर त्यांना पायउतार व्हावे लागले होते, याची आठवणही अनेकांनी करून दिली. वाचाः जल्लोषावर विरजण भाजपने पक्ष कार्यालयासमोर तसेच कार्यकर्त्यांनी शहरात ठिकठिकाणी जल्लोषाची तयारी केली असता, फडणवीस यांच्या निर्णयानंतर हा कार्यक्रम रद्द करावा लागला. उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी आतषबाजी करून जल्लोष केला.