
जालना : दिल्या घरी सुखी रहा, तुमचं आमचं नातं तुटलं, अर्जुन खोतकरांना जय महाराष्ट्र, अशा भावना शिवसैनिकांनी व्यक्त केल्या आहेत.अर्जुन खोतकर एक दिवस दगा देणार याची मला पक्की खात्री होती, असं शिवसेना नेते विनोद घोसाळकर यांनी म्हटलं आहे. जालन्यात अर्जुन खोत करांनी पत्रकार परिषद घेऊन शिंदे गटात सामील झाल्याचे जाहीर करताच जालना जिल्हा शिवसेनेत याचे पडसाद पाहायला मिळाले. शिवसेनेचे संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर यांनी तर अर्जुन खोतकर एक दिवस दगा देणार याची आपल्याला खात्री होती असं सांगितलं. आता शिवसेनेचा मोठा गट खोतकर यांच्या पाठीमागे नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे शिंदे गटात गेलेले अर्जुन खोतकर अक्षरशः एकटे पडल्याचे चित्र आज दिसून आले. अर्जुन खोतकर यांनी शिंदे पक्षातील प्रवेश जाहीर करताच जालन्यात शिवसेनेच्या कट्टर कार्यकर्त्यात खदखद दिसून आली. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर,माजी आमदार शिवाजी राव चोथे, माजी आमदार संतोष सांबरे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अर्जुन खोतकर यांनी शिंदे गटाचा सहारा घेतल्या बरोबर जालना जिल्ह्यातील तमाम शिवसैनिकांना धक्का बसला आहे.खोतकर यांनी घेतलेला निर्णय हा अत्यंत चुकीचा असल्याचं शिवसैनिक बोलत आहेत.शिंदे गटात गेलेल्या खोतकरांना तिथे काही मिळणार नसल्याचं शिवसैनिक म्हणत आहेत. खोतकर हे गेली ३५ वर्ष शिवसेना पक्षाचे राजकारण करत होते. परंतु त्यांनी आज घेतलेला निर्णय दुर्दैवी आहे, अशी भावना शिवसैनिकांनी व्यक्त केली आहे. या सगळ्या घडामोडीचा पार्श्वभूमीवर आता जालन्याला शिवसेनेचे नेतृत्व कुणाच्या रूपाने मिळणार हा प्रश्न सतावतो आहे. परंतु, अत्यंत अनुभवी,अभ्यासू आणि जनतेच्या कामासाठी तत्पर असलेल्या शिवसेना जिल्हा प्रमुख भास्करराव आंबेकर यांचे नाव सर्वात पुढे आहे. आज जालन्यातील शिवसैनिकांनी त्यांच्या नावाच्या घोषणा देत शिवसेनेचे भावी विधानसभेचे उमेदवार म्हणून शिक्कामोर्तब केलंय. अर्जुन खोतकर यांच्या बरोबरीने शिवसेनेचे काम करत असताना भास्करराव आंबेकर यांची एक स्वतःची शैली आहे. जालना नगर पालिकेच्या माध्यमातून त्यांनी केलेली कामे ही जालनेकरांना माहिती आहेत.मुळात अभ्यासू असलेल्या आंबेकर यांचा दांडगा जनसंपर्क असून शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये लाडके नेतृत्व म्हणून ओळखले जाते. त्यामुळे आज दौऱ्यानिमित्त आलेल्या शिवसेना संपर्क प्रमुखांनी देखील बोलता बोलता त्यांच्या नावाची शिफारस पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे करणार असल्याचे सांगितले आणि शिवसैनिकांमध्ये खरोखर उत्साह संचारला आहे.त्यामुळे जालना शिवसेनेसाठी भास्करराव आंबेकर यांच्या रूपाने अनुभवी चेहरा मिळतोय.