
बर्मिंगहम : सुवर्णपदकासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला क्रिकेटचा सामना चांगलाच रंगतदार झाला. पण भारताला या सामन्यात पराभव पत्करावा लागला आणि रौप्यपदक मिळाले. पण भारताचे हे राष्ट्रकुलमधील पहिले पदक आहे. कारण यापूर्वी भारताच्या एकाही क्रिकेट संघाला राष्ट्रकुल स्पर्धेत पदक जिंकता आलं नव्हतं. त्यामुळे भारतासाठी हे राष्ट्रकुलमधील पहिलेच पदक आहे. त्यामुळे जे भारताच्या पुरुष क्रिकेट संघाला जमलं नाही ते महिलांनी आज करून दाखवलं आहे. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना १६१ धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाच्या १६२ धावांचा आव्हानाचा पाठलाग करताना भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने ६५ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. पण तिला अन्य खेळाडूंची साथ मिळाली नाही आणि त्यामुळेच भारताला पराभव पत्करावा लागला. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाच्या बेथ मुनीने या सामन्यात ६१ धावांचची धडाकेबाज खेळी साकारली आणि त्यामुळेच त्यांना प्रथम फलंदाजी करताना १६१ धावा उभारता आल्या. ऑस्ट्रेलियाच्या अन्य फलंदाजांना जास्त काळ खेळपट्टीवर उभे राहता आले नाही. भारताकडून यावेळी स्नेह राणा आणि रेणुका सिंग यांनी प्रत्येकी दोन विकेट्स मिळवल्या. ऑस्ट्रेलियाच्या १६२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला पहिला धक्का दुसऱ्याच षटकात बसला. सलामीवीर स्मृती मानधना बाद झाली आणि त्यानंतर भारताचा डाव कोसळायला सुरुवात झाली. पण यावेळी कर्णधार हरमनप्रीतने संघाला डाव सावरला. हरमनप्रीतने ४३ चेंडूंत पाच चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ६५ धावांची खेळी साकारली. पण तिला अन्य खेळाडूंची चांगली साथ मिळाली नाही. त्यामुळे भारताचा ऑस्ट्रेलियाने ९ धावांनी पराभव केला आणि सुवर्णपदक आपल्या नावावर केले. भारताची राष्ट्रकुल स्पर्धेतील कामगिरी...भारताने उपांत्य फेरीच्या सामन्यात यजमान इंग्लंडवर दमदार विजय साकारला आणि त्यांनी अंतिम फेरीत स्थान पटकावले आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडपुढे १६५ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला १६० धावा करता आल्या आणि भारताने चार धावांनी विजय साकारला. स्मृतीने या सामन्यात ३२ चेंडूंत आठ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ६१ धावांची धमाकेदार खेळी साकारली आणि भारताला दमदार सुरुवात करून दिली. स्मृतीच्या या भन्नाट खेळीमुळेच भारताला १०च्या सरासरीने सुरुवात करता आली होती. भारताच्या १६५ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात आश्वासक झाली नाही. भारताच्या स्नेह राणाने यावेळी दोन तर दीप्ती शर्माने एक विकेट मिळवली. पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे भारताने यावेळी तीन विकेट्स या धावचीत करत मिळवल्या. त्यामुळे भारताने या सामन्यात फक्त फलंदाजी आणि गोलंदाजीच नाही तर क्षेत्ररक्षणही उत्तम केल्याचे पाहायला मिळाले. यापूर्वी भारताने पाकिस्तान आणि बार्बाडोस यांच्यावर दणदणीत विजय साकारला होता. पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या साखळी आणि अंतिम सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला.