
अकोला : गेल्या चार दिवसांपासून अकोल्यात विविध भागात पावसाची रिपरिप सुरू आहे. अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाल्याने पिकांना फटका बसला आहे. मागील चार दिवसात जिल्ह्यात ७७ मिलीमीटर पाऊस झाला आहे. याशिवाय पुढील ६ दिवस म्हणजे २० सप्टेंबरपर्यंत विदर्भात अनेक भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यात १० सप्टेंबरपासून सलग पाऊस सुरू आहे. १४ सप्टेंबरलाही दुपारनंतर जोरदार पाऊस झाला. १२ सप्टेंबरला जिल्ह्याच्या विविध भागात मेघगर्जना, विजांच्या कडकडाटात वादळी पाऊस झाला. तर, काल मंगळवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. चार दिवसात जिल्ह्यातील तेल्हारा, अकोट आणि अकोट तालुक्यामधील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. ११ सप्टेंबरला तेल्हारा तालुक्यात २२.०७ मिलीमीटर पाऊस झाला. अमरावतीचे हवामान तज्ज्ञ प्रा. अनिल बंड यांच्या अंदाजानुसार, विदर्भात पुढील सहा दिवस, २० सप्टेंबरपर्यंत पावसाची शक्यता दिली आहे. ठळक कमी दाबाचे क्षेत्र वायव्य मध्य प्रदेशवर आहेत. सोबतच ७.६ किमी उंचीवर चक्राकार वारे आहेत. हे कमी दाबाचे क्षेत्र उत्तर-वायव्य दिशेने हळूहळू पुढे सरकत आहे. या वातावरणामुळे १५ ते २० सप्टेंबरदरम्यान विदर्भात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अनेक भागात शेतशिवारात पावसाचे पाणी तेल्हारा तालुक्यात तब्बल ४८.१ मिलीमीटर तर अकोट आणि बाळापूर तालुक्यात ४५ मिमीच्यावर पाऊस होता. कालच्या तारखेत अकोट तालुक्यात सर्वाधिक २७.२ मिमी पाऊस झाला. जिल्ह्यातील जलप्रकल्प, शेती आणि सिंचनासाठी हा पाऊस समाधानकारक असला तरी अती पावसामुळे शेत-शिवार खरडून गेल्याने अनेक पिकांना याचा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी कपाशीची शिवार खरडून निघाली असून शेतशिवारात पावसाचे पाणी साचले. त्यामुळे शेतातील पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. आतापर्यंतच्या सरासरीनुसार जिल्ह्यात ६३० मिलीमीटर पावसाची अपेक्षा राहते, त्यानुसार सुमारे ६२३ मिलीमीटर पाऊस अकोला जिल्ह्यात झाला आहे. आताच्या सरासरीनुसार पावसाचे जिल्ह्यातील प्रमाण ९८.८ मिलीमीटर झाला असून पावसाळ्यातील सरासरीचा विचार केल्यास जिल्ह्यात ६९३.७ मिलीमीटर पाऊस होतो. त्या तुलनेत ८९ टक्के'च्यावर पाऊस झाला आहे. मागील वर्षी हे प्रमाण १०७.०२ टक्के होते. दरम्यान, पश्चिम विदर्भातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात मागील तीन दिवसापासून सर्वत्र जोरदार पाऊस सुरु आहेय. त्यामुळे नदी-नाले दुथडी भरुन वाहत आहेत. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. जोरदार पावसामुळे त्यामुळे अनेक प्रकल्पांचे दरवाजे उघडावे लागले तर मध्यम प्रकल्प ओंसडून वाहत आहे. सध्या ९ मोठ्या प्रकल्पांपैकी ८ तर २७ मध्यम प्रकल्पांपैकी २० आणि शेकडो लघू प्रकल्प ओसंडून वाहत आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून मोठ्या प्रकल्पांपैकी अमरावती जिल्ह्यातील ऊर्ध्व वर्धा, यवतमाळ जिल्ह्यातील पुस, अरुणावती, बेंबळा. अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा, वान. बुलडाणा जिल्ह्यातील पेनटाकळी, खडकपूर्णा या प्रकल्पातून विसर्ग सुरु आहे.