
म. टा. प्रतिनिधी, ठाणेः जिल्ह्यात लंपी त्वचारोगामुळे आजपर्यंत २६ जनावरे बाधित आढळली आहेत. या आजाराचा प्रसार होऊ नये यासाठी जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये गुरांचा बाजार बंद करण्यात आला असून जनावरांच्या शर्यती, प्रदर्शनही बंद केल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली. पशुसंवर्धन विभागाने खबरदारीचे उपाय म्हणून हे पाऊल उचलले आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर, भिवंडी, अंबरनाथ या तीन तालुक्यांमध्ये लंपी रोगाचे १२ केंद्र बिंदू असून, एकूण २६ जनावरे या आजाराने बाधित आढळून आली आहेत. लंपी त्वचारोगाचे संक्रमण वाढू नये यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून विविध उपायोजना करण्यात येत आहेत. यामध्ये बाधित भागातील पाच किलोमीटर परिघातील परिसरात लसीकरण करण्यात येत आहे. जिल्ह्यात पाच शीघ्र कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. बाधित क्षेत्रातील पाच किलोमीटर परिघातील परिक्षेत्रात एकूण सात हजार ७६ जनावरे आहेत. या क्षेत्रातील सात हजार नऊ जनावरांचे लसीकरण करण्यात आले असून, उर्वरित सर्व जनावरांचे लसीकरण करण्याचे काम सुरू आहे. संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या परिसरात सर्व रोग नमुने, बाधित जनावरांना उपचार, रोगप्रतिबंधक लसीकरण यासाठी कोणत्याही प्रकारचे सेवाशुल्क आकारण्यात येत नसून सर्व सेवा मोफत देण्यात येत आहेत. याबाबत जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकांना सूचित करण्यात आलेले आहे. येथे संपर्क करा ठाणे जिल्ह्यात लंपी त्वचारोगामुळे नागरिकांनी भयभीत होण्याची गरज नाही. हा आजार जनावरांपासून माणसांना होण्याची शक्यता अजिबात नसून, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या सेवनाने मनुष्यांना कोणत्याही प्रकारचा संसर्ग होत नाही, असे विभागाचे म्हणणे आहे. आवश्यक सर्व औषधे, लससाठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असून, सर्व क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी सतर्क आहेत. लंपीसदृश्य लक्षणे असलेले जनावर निदर्शनास आल्यास नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा अथवा १९६२ या हेल्पलाइनवर कॉल करावा. या आजाराबाबत कोणतीही भीती आणि शंका बाळगण्याची गरज नाही, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे.