राणांचे बांधकाम नियमितीकरण रखडले; आवश्यक कागदपत्रे जमा न केल्याचा पालिकेचा दावा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, September 21, 2022

राणांचे बांधकाम नियमितीकरण रखडले; आवश्यक कागदपत्रे जमा न केल्याचा पालिकेचा दावा

https://ift.tt/BLKPlmI
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार दाम्पत्याच्या मुंबईच्या घरातील बेकायदा बांधकामांचे नियमितीकरण अद्याप रखडलेलेच आहे. शहर दिवाणी न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार मुंबई महापालिकेने राणा दाम्पत्याचे बांधकाम नियमित करण्यासाठी काही आवश्यक कागदपत्रांची मागणी मे महिन्यात केली होती. मात्र, चार महिन्यांनंतरही ही कागदपत्रे जमा करण्यात आली नसल्याचा दावा पालिकेने केला आहे. त्यामुळे नियमितीकरणाबाबत प्रशासनाला कोणताही ठोस निर्णय घेता आलेला नाही. खार पश्चिम, १४वा रस्ता येथील लाव्ही इमारतीत राणा दाम्पत्याचे घर आहे. पालिकेच्या मंजूर आराखड्याव्यतिरिक्त अधिक बांधकाम या घरात करण्यात आले असल्याचा पालिकेचा दावा आहे. राणांसोबत इमारतीतील अन्य रहिवाशांच्या घरातही बेकायदा बांधकामे करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली आहे. पालिका कायद्याचे उल्लंघन केले असल्याच्या तक्रारीवरून प्रशासनाने राणा यांच्यासह इतर रहिवाशांनाही कलम ४८८ नुसार नोटीस दिली आहे. अवैध बांधकामे न हटवल्यास पालिका कारवाई करील, असे या नोटिशीत स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, या संभाव्य कारवाईविरुद्ध व बांधकाम नियमितीकरणासाठी राणा दाम्पत्याने शहर दिवाणी न्यायालयात धाव घेतली होती. मे २०२२मध्ये याप्रकरणी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने राणा दाम्पत्याला पालिकेच्या इमारत प्रस्ताव विभागाच्या कार्यकारी अभियंत्याकडे आपल्या वास्तुविशारदामार्फत एक महिन्याच्या आत नियमितीकरणाचा प्रस्ताव द्यावा; तसेच या प्रकरणात एका महिन्यात निर्णय घेण्याचे निर्देश पालिकेला दिले होते. कोणत्याही कारणास्तव प्रस्ताव नाकारला गेल्यास त्यानंतर दोन आठवड्यांपर्यंत पालिकेस कारवाई करण्यास मनाई करण्यात येत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. वेळेत प्रस्ताव आणल्यास पालिका आपल्या आदेशानुसार आणि १० मे रोजी पाठवलेल्या कारवाईच्या नोटिशीनुसार योग्य कारवाई करू शकते, असे न्यायालयाने स्पष्ट म्हटले आहे. ‘नवा प्रस्ताव नाही’ महापालिकेच्या पश्चिम उपनगर इमारत प्रस्ताव विभागाचे कार्यकारी अभियंता विजय तावडे यांच्याकडे विचारणा केली असता, ‘राणा यांच्या वास्तुविशारदाने पालिकेकडे नियमितीकरणाचा प्रस्ताव दिला आहे. त्यात पालिकेने आणखी काही कागदपत्रांची मागणी राणांकडे केली आहे. मात्र अद्याप नवीन कागदपत्रांसह पुन्हा पालिकेत प्रस्ताव देण्यात आलेला नाही,’ असे त्यांनी स्पष्ट केले. रवी राणा यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी वारंवार प्रयत्न करूनही संपर्क होऊ शकला नाही.