शिंदे-फडणवीसांच्या भेटीसाठी रवी राणा मुंबईला रवाना, बच्चू कडूंसोबतच्या वादावर तोडगा निघणार? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, October 30, 2022

शिंदे-फडणवीसांच्या भेटीसाठी रवी राणा मुंबईला रवाना, बच्चू कडूंसोबतच्या वादावर तोडगा निघणार?

https://ift.tt/g9ZH8VT
नागपूर: शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू आणि भाजप पुरस्कृत आमदार रवी राणा यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या वादावर आता तोडगा निघण्याची शक्यता आहे. कारण, रवी राणा हे रविवारी पहाटे मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. ते दुपारी १२ च्या सुमारास मुंबईत दाखल होतील. त्यानंतर रवी राणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहेत. त्यामुळे आता शिंदे-फडणवीस यांच्या मध्यस्थीने बच्चू कडू () आणि रवी राणा यांच्यातील वाद मिटण्याची चिन्हे आहेत. नागपूरहून मुंबईला रवाना होण्यापूर्वी रवी राणा () यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही माझे नेते आहेत. त्या दोघांनी मला आज भेटायला बोलावले आहे. त्यानुसार मी त्यांच्या भेटीसाठी मुंबईला जात आहे, असे रवी राणा यांनी सांगितले. त्यामुळे आजच्या या भेटीत काय घडणार, याकडे राजकीर्य वर्तुळाचे लक्ष लागले आहे. बच्चू कडू यांनी शिंदे गटासोबत गुवाहाटीला जाण्यासाठी ५० खोके घेतले, असा आरोप रवी राणा यांनी केला होता. त्यामुळे संतापलेल्या बच्चू कडू यांनी रवी राणा यांच्यावर प्रतिहल्ले करायला सुरुवात केली होती. रवी राणा यांनी १ नोव्हेंबरपर्यंत मी पैसे घेतल्याचे पुरावे सादर करावेत, असे आव्हान बच्चू कडू यांनी दिले होते. तसेच वेळ पडल्यास आपण शिंदे-फडणवीस सरकारमधून बाहेर पडू, असे संकेतही बच्चू कडू यांनी दिले होते. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस काय करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. दिवाळीनंतर रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात समेट घडवून आणला जाईल, अशी चर्चा होती. त्यानुसार आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी पावले टाकायला सुरुवात केल्याचे दिसत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये रवी राणा आणि बच्चू कडू यांनी परस्परांवर अत्यंत खालच्या भाषेत चिखलफेक केली आहे. त्यामुळे आता शिंदे-फडणवीस या दोघांचे मनोमीलन कसे घडवून आणणार, हे पाहणे औत्स्युकाचे ठरेल. तसेच येत्या काही दिवसांमध्ये शिंदे-फडणवीस सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार होऊ घातला आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळवण्यासाठी बच्चू कडू आणि रवी राणा दोघेही उत्सुक आहेत. त्यामुळे आजच्या भेटीत शिंदे आणि फडणवीस रवी राणा यांना मंत्रिपदाचे आश्वासन किंवा तत्सम जबाबदारी देणार का, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. रवी राणा यांच्या भेटीनंतर बच्चू कडू हेदेखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटू शकतात किंवा शिंदे-फडणवीस यांच्याकडून बच्चू कडू आणि रवी राणा यांना समोरासमोर बसवून हा वाद मिटवला जाऊ शकतो. त्यादृष्टीने रवी राणा यांची शिंदे-फडणवीस यांच्यासोबतची बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे.