म. टा. प्रतिनिधी, पुणे: ‘राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे (एनडीए) ७० टनांचे रणगाडे जातील, इतका मजबूत पूल करावा,’ असे आम्हाला सांगण्यात आले होते. त्यानुसार आम्ही पूल उभारला, अशी आठवण चांदणी चौकातील जुना पूल बांधणारे सिव्हिल इंजिनीअर व डिझायनर सतीश मराठे (वय ७६) यांनी सांगितली. ‘या पुलासाठी आवश्यक तेवढेच स्टील वापरले होते. मात्र, आता खूप स्टील वापरल्याचे बोलेले गेले; पण तसे काहीही केले नव्हते. ज्यांना हा पूल पाडायचा होता, त्यांना ते नीट जमले नाही,’ असेही ते म्हणाले. पुणे-बेंगळुरू महामार्गावर चांदणी चौकात होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी येथील जुना पूल पाडण्यात आला. त्यासाठी सहाशे किलो स्फोटके वापरण्यात आली. मात्र, या शक्तिशाली स्फोटानंतरही पूल अभेद्य राहिला होता. त्यामुळे हा पूल नेमका कोणी आणि कसा बांधला अशी चर्चा सुरू झाली होती. त्या पार्श्वभूमीवर हा पूल बांधणारे मराठे यांच्याशी संवाद साधला. मराठे आणि त्यांचे भागीदार मित्र अनंत लिमये यांची बरली इंजिनीअर्स नावाची कंपनी होती. चांदणी चौकातील त्या पुलाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने आमच्याकडून करवून घेतले. पुलाचे डिझाइन मराठे यांनी केले होते. तेव्हा कुलकर्णी आणि देशपांडे नावाचे सरकारी इंजिनीअर होते. त्यांनीदेखील प्रामाणिकपणे काम केल्याचे सांगितले. शंभर दिवसांत शंभर मीटरचा पूल मराठे आणि लिमये यांनी १९८२ ते २००२ दरम्यान २५ पूल बांधले आहेत. त्यात सर्वाधिक पूल पुणे विभागातील आहेत. कोल्हापूर, सातारा, नाशिक, निफाड येथेही त्यांनी पूल बांधले आहेत. निफाड येथील शंभर मीटरचा पूल फक्त शंभर दिवसांत बांधला होता. तरीही पूल उभाच ‘चांदणी चौकातील पूल बांधला त्याच काळात (१९९२) त्यांनी आळंदीचा पूल बांधला आहे. तेव्हा इंद्रायणी नदीची पूररेषा खूप खाली होती. त्यामुळे पुलावरून पाणी जाईल, असे आम्हाला सांगण्यात आले नव्हते. आता पुलावरून पाणी जात आहे, तरीही तो उभा आहे,’ असेही मराठे यांनी सांगितले. म्हणून व्यवसाय केला बंद... ‘राज्यात बांधकाम प्रकल्पासाठी ‘पीपीपी’अंतर्गत बांधा, पैसे खर्च करा आणि टोलद्वारे पैसे घ्या, असे धोरण आले. तेव्हा एखाद्या प्रकल्पासाठी ३०० ते ४०० कोटी रुपये उभे करणे शक्य नव्हते. त्यामुळे आम्ही २००२ पासून आमचा व्यवसाय बंद केला,’ असेही मराठे म्हणाले. कोणाला नफा किती जास्त हवा, त्यावर कामाचा दर्जा ठरतो. चांगले काम करूनही नफा मिळतो. मी १९७० मध्ये अभियांत्रिकीची पदवी मिळविली. तेव्हा आम्हाला एका पुलाचे आयुष्य १०० वर्षे असल्याचे सांगण्यात आले होते. माझ्या मुलाने पदवी घेतली तेव्हा त्याला पुलाचे आयुष्य ५० वर्षांचे असते, असे सांगितले गेले. - सतीश मराठे मटा भूमिका चांदणी चौकातील पूल पाडल्यानंतर लगेच येथील वाहतूक समस्या दूर होणार नाही, हे सर्वांनाच माहिती होते; पण म्हणून दुसऱ्या दिवशी कोणालाही काहीही न सांगता आणि कोणतीही पूर्वसूचना न देता हा महामार्ग २० मिनिटे रोखून धरण्याचे अजब काम यंत्रणांनी केले. त्याचा फटका या रस्त्याने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनाच बसला असे नाही, तर शाळकरी मुलांना तासन् तास अडकून पडावे लागले. निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मिळाले म्हणजे आपणच सर्वशक्तीमान असल्याच्या बेफिकिरीतून यंत्रणांनी थेट गर्दीच्या वेळी वाहतूक थांबविण्याचा अविवेकी प्रकार केला. पहिल्या ‘ब्लॉक’मधून वाहतूक पूर्वपदावर येत नाही, तोच दिवसा याप्रकारे वाहतूक रोखून नागरिकांना गृहित धरण्याचे हे काम निश्चितच वेदनादायी आहे. सोमवारच्या गोंधळानंतर मंगळवारी रात्री ‘ब्लॉक’ घेतला जाणार असल्याचे जाहीर केले गेले. मग, हेच शहाणपण सोमवारी का सुचले नाही? याचे उत्तर सर्व संबंधितांनी द्यायला हवे.
https://ift.tt/ue0paXO