PM मोदींनी केलं आवाहन, 'पोलिसांसाठी हवा एक देश, एक गणवेश' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, October 29, 2022

PM मोदींनी केलं आवाहन, 'पोलिसांसाठी हवा एक देश, एक गणवेश'

https://ift.tt/CIz9UiY
वृत्तसंस्था, सुरजकुंड (हरियाणा) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी पोलिसांसाठी 'एक देश, एक गणवेश' ही संकल्पना मांडली. 'हा केवळ एक विचार असूनस मी तो राज्यांवर लादण्याचा प्रयत्न करीत नाही,' असे त्यांनी या वेळी स्पष्ट केले. राज्यांच्या गृहमंत्र्यांच्या दोन दिवसांच्या चिंतन शिबिराला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी संबोधित केले. तरुणांना दहशतवादाकडे ढकलण्यासाठी आणि येणाऱ्या पिढ्यांची मने कलुषित करण्यासाठी आपली बौद्धिक कक्षा विस्तारणाऱ्या शक्तींना त्यांनी या वेळी इशारा दिला. 'देशातील तरुणांची दिशाभूल होऊ नये, यासाठी माओवादाचा प्रत्येक प्रकार मग तो बंदुकीचा असो किंवा पेनाचा उखडून फेकून दिला पाहिजे. देशाच्या एकता आणि अखंडतेसाठी सरदार पटेल यांच्या प्रेरणेने अशा कोणत्याही शक्तींना आम्ही आपल्या देशात वाढू देऊ शकत नाही. या शक्तींना आंतरराष्ट्रीय मदतही मिळते,' असेही मोदी यांनी अधोरेखित केले. जुन्या कायद्यांचा फेरविचार करा आणि सद्यपरिस्थितीनुसार त्यामध्ये सुधारणा करा, असे आवाहन मोदी यांनी राज्य सरकारांना केले. कायदा आणि सुव्यवस्था, सुरक्षा याबाबत येणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी सर्व संस्थांमध्ये समन्वित कारवाई करावी, असेही त्यांनी सांगितले. 'पोलिसांबाबत चांगली धारणा असणे खूप महत्त्वाचे असून यातील त्रुटी दूर करायला हव्यात. घटनेनुसार कायदा व सुव्यवस्था हा राज्यांचा विषय असला, तरी देशाच्या एकता आणि अखंडतेशी तितकाच जोडलेला आहे. प्रत्येक राज्याने एकमेकांपासून शिकायला हवे, प्रेरणा घ्यायला हवी आणि अंतर्गत सुरक्षेसाठी राज्यांनी एकत्र काम करायला हवे,' असेही मोदी यांनी नमूद केले. 'व्हिजन २०४७' आणि 'पंच प्राण' याबाबतची अंमलबजावणी करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याच्या उद्देशाने हे शिबीर घेण्यात येत आहे. 'एक गणवेश'मागची संकल्पना 'एक देश, एक गणवेश' ही संकल्पना मांडताना त्यामागचा विचार मोदी यांनी अधोरेखित केला. देशभरातील पोलिसांची ओळख एकसमान असू शकते, असे मला वाटते. हे पाच, ५० किंवा १०० वर्षांतही घडू शकते; पण आपल्याला याबाबत विचार करायला हवा, असे मोदी म्हणाले. 'मोठ्या प्रमाणावर वापर होणार असल्याने याद्वारे गुणवत्तापूर्ण उत्पादनांची निर्मिती सुनिश्चित केली जाईल. शिवाय कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या पोलिसांना समान ओळख मिळेल,' असे म्हणणे त्यांनी या वेळी मांडले. बोगस बातम्यांवरही भाष्य बोगस बातम्यांच्या प्रसाराबाबतही मोदी यांनी भाष्य केले. अशा बातम्यांचे तथ्य तपासणे आवश्यक आहे. यामध्ये तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावते. संदेश फॉरवर्ड करण्याच्या आधी त्याची पडताळणी करण्याच्या यंत्रणेबाबत नागरिकांना जागृत करायला हवे, असे पंतप्रधान म्हणाले. स्मार्ट तंत्रज्ञानावरही त्यांनी भर दिला. पर्यटनाशी संबंधित पोलिसिंगसाठी विशेष क्षमता विकसित करण्याबाबत विचार करण्याची गरज व्यक्त करत पोलिस वाहने कधीही जुनी नसावीत. त्याचा दलाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो, असेही त्यांनी नमूद केले.