मुंबई: ज्येष्ठ नेते हे रात्री दहा-साडेदहाला झोपत होते व तरीही त्यांनी पक्ष वाढविला. त्यासाठी मध्यरात्री दोन व चार वाजेपर्यंत बैठका घेण्याची त्यांना गरज नव्हती, असा टोला खासदार () यांनी भाजपच्या नेत्यांना लगावला आहे. त्यांच्या या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. पुनम महाजन यांच्या या टीकेचा रोख नेमका कोणाच्या दिशेने होता, याविषयीही अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. प्रमोद महाजन यांच्या ७३ व्या जन्म दिवसा निमित्त ज्येष्ठ गायक श्रीधर फडके यांच्या गीतरामायण कार्यक्रमाचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. यावेळी पुनम महाजन यांनी प्रमोद महाजन यांच्या आठवणींना उजाळा देताना अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी पुनम महाजन यांनी स्वपक्षीयांना लगावलेले टोले सर्वाधिक चर्चेचा विषय ठरले. प्रमोद महाजन हे कधी कोणाचे ‘ साहेब ‘ नव्हते, प्रमोदजी होते. ते असामान्य व्यक्तिमत्व होते. केवळ रालोआतील नव्हे, तर मुलायमसिंह यादव, शरद पवार, ममता बनर्जी यांच्यासह देशातील अनेक पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी प्रमोद महाजन यांचे मैत्रीचे संबंध होते, असे पुनम महाजन यांनी सांगितले. यावेळी पुनम महाजन यांनी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीविषयी नाराजीचा सूर व्यक्त केला. राज्याचे उपमुख्यमंत्री हे सध्या म्हाळगी प्रबोधिनीचे अध्यक्ष आहेत. रामभाऊ म्हाळगी संस्थेला गेल्या आठवड्यात ४० वर्षे झाली. प्रमोद महाजन यांनी केशवसृष्टी येथे जागा घेऊन आणि विचाराधिष्ठित स्वरूप देऊन ही संस्था नावारूपाला आणली. या संस्थेत प्रमोद महाजन यांचे छोटे छायाचित्र आहे. मात्र, ४० वर्षांच्या वाटचालीनिमित्ताने प्रमोद महाजन यांच्या योगदानाबद्दल संस्थेने किमान समाजमाध्यमांवर एखादा संदेश जरी प्रसारित केला असता, तर मला मुलगी म्हणून बरे वाटले असते, अशी खोचक टिप्पणी पुनम महाजन यांनी केली. त्यामुळे पुनम महाजन यांच्या टीकेचा रोख नक्की कोणाच्या दिशेने होता, याची सध्या राजकीय वर्तुळात बरीच चर्चा रंगली आहे.