गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर अनर्थ टळला; चिमुकली मुलं ओरडताच जीवरक्षक धावले,मुलीसह वडिलांना वाचवलं - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, November 5, 2022

गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर अनर्थ टळला; चिमुकली मुलं ओरडताच जीवरक्षक धावले,मुलीसह वडिलांना वाचवलं

https://ift.tt/qFhdQH3
रत्नागिरी : गणपतीपुळे येथील समुद्रात शुक्रवारी पुन्हा दोन पर्यटकांना बुडताना वाचवण्यात यश आले आहे. कोल्हापूर येथील रणावरे कुटुंबातील दोन लहान मुलांनी आरडाओरडा केल्याने तात्काळ हा प्रकार लक्षात येताच मोरया स्पोर्ट्सच्या जीवरक्षकांनी समुद्रातून १६ वर्षीय मुलीचे व तिला वाचवण्यासाठी गेलेल्या वडिलांचे प्राण वाचवले आहेत.यावेळी ऋषाली योगेश रणावरे वय १६ तसेच वडील योगेश रनावरे वय ५५ या दोन्ही पर्यटकांना गणपतीपुळे येथील मोरया स्पोर्ट्सच्या जीवरक्षकांनी जेट्स्कीच्या मदतीने वाचवण्यात यश आले आहे. ऋषाली समुद्रात जवळपास किनाऱ्यापासून दीडशे ते दोनशे फुट अंतरावर अक्षरशः बुडता बुडता वाचली आहे. दोन लहान मुलांनी केलेला आरडाओरडा व येथील मोरया स्पोर्ट्सच्या जीवरक्षकांनी जीवाची बाजी लावत केलेली धावपळ यामुळे या बाप व लेकीचे जीव वाचले आहेत. कोल्हापूर येथील रणावरे कुटूंब गणपतीपुळे येथे ४ नोव्हेंबर रोजी कारने पर्यटनासाठी आले होते. गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर समुद्रात ,शंभर फूट अंतरावर पोहत होते. पण, पाण्याचा अंदाज न आल्याने ऋषाली ही गटांगळ्या खात असल्याचे लक्षात वडील योगेश यांच्या लक्षात येताच त्यांनी समुद्रात धाव घेतली पण तेही बुडण्याचा धोका निर्माण झाला होता. हा सगळा प्रकार याच कुटूंबातील दोन लहान मुलांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा सुरू केला. मोरया स्पोर्ट्स गणपतीपुळे यांनी तात्काळ तीन जेट्स्की समुद्रात घातल्या योगेश यांना लाईफ जॅकेट देऊन वाचवले. पण, यावेळी ऋषाली बुडत असताच जेट्स्की चालवणाऱ्या एकाने उडी मारून तिला वर घेत अन्य दोन जेट्स्कीच्या मदतीने किनाऱ्यावर आणले. वृषालीनं बऱ्यापैकी पाणी पियाल्याने ती अस्वस्थ होती तिला तात्काळ याच जीवरक्षकांनी रुग्णवाहिके मधून जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. आता तिची प्रकृती स्थिर असून हे कुटूंब संध्याकाळी उशिरा कोल्हापूरकडे सुखरूप रवाना झालं आहे. मोरया स्पोर्ट्सने गेल्या दहा वर्षांत आजवर हजारो पर्यटकांचे जीव वाचवले आहेत. दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर येथील एका पर्यटकाचे प्राण वाचवले आहेत. बुधवारी बनाना राईड करून परत येत असताना विजय बाबासाहेब वणकुद्रे यांचे पाय टेकले नाहीत त्यामुळे ते पाण्यात बुडण्याचा धोका निर्माण झाला होता पण याच मोरया स्पोर्ट्सच्या सागरी जीवरक्षकांनी सतर्कता बाळगत त्यांना वाचवले.