
मुंबई : मुंबईमध्ये छुप्या पद्धतीने वृक्षतोड करण्याचे प्रकार सुरूच आहेत. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मालाडमध्ये एक हजारपेक्षा अधिक झाडांची कत्तल केल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. तसाच प्रकार गोरेगाव येथे उघडकीस आला आहे. याठिकाणी असलेल्या सेंट जोसेफ चर्चच्या मागील मोकळ्या भूखंडावरील वेगवेगळ्या प्रकारच्या ११३ झाडांची कत्तल करण्यात आली आहे. याबाबत दिंडोशी पोलिस ठाण्यात चर्चचे फादर आणि तोडकाम करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोरेगाव पूर्वेकडील सेंट जोसेफ चर्चच्या पाठीमागील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेवर शेकडो मोठे वृक्ष असून यातील अनेक वृक्ष कोणतीही परवानगी न घेता तोडण्यात आल्याची तक्रार एका माजी नगरसेविकेने पालिकेच्या पी दक्षिण विभागात केली होती. या तक्रारीची दखल घेत या कार्यालयातील उद्यान सहाय्यकांनी या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता, गुलमोहर झाडाच्या फांद्या तोडण्यात आल्याचे दिसून आले. या परिसराची पाहणी करीत असताना काही झाडांच्या भोवतालची माती काढून मुळे उघडी केल्याचे निदर्शनास आले. काही ठिकाणी मातीचा भराव टाकण्यात आला होता. हे सर्वच संशयास्पद वाटत असल्याने उद्यान सहाय्यकांनी या ठिकाणची वृक्ष गणना केलेल्या संस्थेकडून याबाबतचा अहवाल मागवला. २०१५-१६मध्ये केलेल्या वृक्ष गणनेनुसार या ठिकाणी लहान-मोठे १३९ वृक्ष होते, अशी नोंद या अहवालामध्ये आहे. उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांनी या अहवालाच्या आधारे चर्चच्या पाठीमागे असलेल्या भूखंडाची पुन्हा बारकाईने पाहणी करताना येथील झाडांची गणना केली. १३९पैकी केवळ २६ झाडेच या भूखंडावर असल्याचे दिसून आले. याबाबत भूखंडाची मालकी असलेल्या सेंट जोसेफ चर्च आणि त्यांच्या फादरकडे चौकशी केली असता समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. त्यामुळे पालिकेच्या उद्यान सहाय्यकांनी याबाबत दिंडोशी पोलिस ठाण्यात तक्रार केली. या तक्रारीवरून पोलिसांनी फादर आणि वृक्षतोड करणाऱ्यांविरुद्ध वृक्ष संवर्धन आणि जतन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.