
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी मंगळवारी त्यांच्या अनुयायांचा विक्रमी महासागर चैत्यभूमीवर उसळला होता. गेली दोन वर्षे करोनामुळे महापरिनिर्वाण दिनी अभिवादनासाठी अनेकांना येता आले नव्हते. आता करोनाचे संकट संपून सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले आहेत. त्यामुळे गेली दोन वर्षे येऊ न शकलेले अनेक जण कुटुंबासह अभिवादनासाठी चैत्यभूमीवर दाखल झाले होते. त्यामध्ये पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशसह देशाच्या अन्य राज्यांतून आलेल्या अनुयायांची संख्याही लक्षणीय होती. मोठ्या संख्येने अनुयायी आल्याने अभिवादनासाठी दूरवर रांगा लागल्या होत्या. द्वारकाबाई गायकवाड या नाशिकहून आपल्या कुटुंबातील सहा जणांसह चैत्यभूमीवर आल्या होत्या. 'गेली दोन वर्षे करोनाची भिती असल्याने केवळ मुलगाच अभिवादनासाठी आला होता, कुटंबातील इतरजण येथे येऊ शकलो नव्हतो. यंदा मात्र कुटुंबातील सर्वजण मुंबईत दाखल झालो आहोत. आम्ही पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास रांग लावली. दुपारी १ वाजता अभिवादनासाठी चैत्यभूमीवर पोहोचलो', असे द्वारकाबाई गायकवाड यांनी सांगितले. महापरिनिर्वाणदिनी राज्यपाल कोश्यारी यांचे गौरवोद्गार भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रुजविलेली स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही तत्वे सर्वव्यापी आहेत, असे गौरवोद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मंगळवारी काढले. दादर येथील चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित शासकीय कार्यक्रमात राज्यपाल बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा आदी उपस्थित होते. राज्यपाल म्हणाले की, भारताच्या संविधानामुळे सर्वांना प्रत्येक क्षेत्रात संधी मिळतात. त्याचे श्रेय आपल्या राज्यघटनेला जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वंचितांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे केलेले काम हे अत्यंत मोठे आहे. भारत घडविण्यात डॉ. बाबासाहेबांचे मोठे योगदान आहे. त्यांचे विचार पुढे नेण्याचे काम करूया, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. इंदूमिल स्मारक लवकरच पूर्ण महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाने सर्वसामान्यांना जगण्याचा हक्क दिला. डॉ. बाबासाहेब यांचे विचार व कार्य जागतिक पातळीवर पोहोचावे यासाठी इंदू मिल येथील स्मारकाचे काम लवकरात-लवकर पूर्ण होण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. डॉ. बाबासाहेबांनी सर्वसामांन्याना स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा दिली. सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून डॉ. बाबासाहेब यांनी राज्यघटना दिली, वैचारिक बळ देऊन गुलामगिरीतून बाहेर पडण्याची प्रेरणा दिली. ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ हा मूलमंत्र दिला. त्यांच्या विचारांवर राज्य सरकार वाटचाल करीत असल्याचे मत यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जगाच्या पाठीवरील सर्वोत्तम संविधान डॉ. आंबेडकर यांनी दिल्याचे सांगितले.