
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : राज्यात शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराला दिल्लीहून अद्याप हिरवा कंदिल मिळालेला नाही, त्यामुळे हिवाळी अधिवेशनानंतरच मंत्रिमंडळ विस्तार मार्गी लागणार असल्याचे समजते. साहजिकच मंत्रीपदाचे बाशिंग गुडघ्याला बांधून बसलेल्या 'बाळासाहेबांची शिवसेना' आणि भाजप या दोन्ही पक्षांतील उतावळ्या आमदारांची अस्वस्था अधिक बिकट झाली आहे. त्यामुळे या आमदारांना, तसेच इतर नाराजांना थोपविण्यासाठी महामंडळाच्या नियुक्तीबाबतच्या हालचालींना गती देण्यात आली आहे. मात्र, मंत्रिमंडळ विस्ताराबरोबरच महामंडळ नियुक्त्यांचा निर्णयही अधिवेशनानंतरच मार्गी लागणार की, अधिवेशनापूर्वी महामंडळ पदरात पडणार याबाबतही अनिश्चितता असल्याचे समजते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची एक महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच मुंबईत पार पडली. या बैठकीत महामंडळांच्या वाटपाबाबत चर्चा झाली असून, नवा फॉर्म्युला ठरविण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. या बैठकीत शिंदे गटाच्या तुलनेत भारतीय जनता पक्षाला अधिक महामंडळे देण्यात येणार असल्याची माहितीही पुढे आली आहे. साधारण आगामी हिवाळी अधिवेशनानंतर या नियुक्त्या जाहीर केल्या जाण्याची शक्यता असून, नाराजांना महामंडळाचे अध्यक्षपद देऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न शिंदे सरकारकडून करण्यात येणार असल्याचे कळते. या बैठकीत राज्यातील १२० महामंडळांचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती पुढे आली असून, दोन टप्प्यांत महामंडळांच्या अध्यक्षांची घोषणा केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. यात पहिल्या टप्प्यात एकूण ६० महामंडळांची घोषणा केली जाणार असून, यात भाजपला ३६ तर शिंदे गटाला २४ महामंडळे मिळतील, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. भाजपला ३६, तर शिंदे गटाला २४ महामंडळे? या बैठकीत विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त जागांवरही चर्चा झाल्याची माहिती पुढे आली असून, राज्यपालनियुक्त १२ जांगांपैकी आठ जागांवर भाजपने दावा सांगितला आहे. तर महामंडळ वाटपातही शिंदे गटाला ४० टक्के आणि भाजपला ६० टक्के महामंडळ असा फॉर्म्युला निश्चित करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. सध्या राज्यात एकूण १२० महामंडळे असून, त्यापैकी मोठ्या मानल्या जाणाऱ्या ६० महामंडळांचे वाटप पहिल्या टप्प्यात होणार असून, भाजपला ३६ तर शिंदे गटाला २४ महामंडळे असे हे वाटप होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.