नकोत गाणी मद्याची...नकोच वाणी गुंडांची! एफएम रेडिओंवरील गाण्यांवर केंद्राचे निर्बंध - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, December 2, 2022

नकोत गाणी मद्याची...नकोच वाणी गुंडांची! एफएम रेडिओंवरील गाण्यांवर केंद्राचे निर्बंध

https://ift.tt/bPR9Vxt
नवी दिल्ली : मद्य, अमली पदार्थ, शस्त्रास्त्रे, गुंड, बंदूकसंस्कृती यांचे उदात्तीकरण करणाऱ्या गाण्यांचे किंवा सामग्रीचे प्रसारण करू नका, असा आदेश केंद्र सरकारने एफएम रेडिओ वाहिन्यांना दिला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने या संदर्भात अटी आणि शर्तींचे काटेकोर पालन करण्याची सूचना एफएम वाहिन्यांना केली आहे. ‘परवानगी करारनामा (जीओपीए) आणि स्थलांतरण परवानगी करारनामा (एमजीओपीए) यामध्ये विहित केलेल्या अटी आणि शर्तींचे काटेकोर पालन करा. या अटींचे उल्लंघन करणारे कोणतेही प्रसारण करू नका; अन्यथा ‘जीओपीए’ आणि ‘एमजीओपीए’ यामधील अटी व शर्तींनुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल,’ अशी सक्त ताकीद माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने एफएम रेडिओ वाहिन्यांना दिली आहे. अशी गाणी किंवा सामग्रीचे प्रसारण करणे हे आकाशवाणी कार्यक्रम संहितेचे उल्लंघन करणारे आहे. त्यासाठी केंद्राला परवानगी निलंबन आणि प्रसारणावर बंदी घालण्याचा अधिकार आहे, असेही मंत्रालयाने एफएम वाहिन्यांना बजावले आहे. काही एफएम वाहिन्यांवरून मद्य, अमली पदार्थ, शस्त्रास्त्रे, गुंड, बंदूकसंस्कृती यांचे उदात्तीकरण करणाऱ्या गाण्यांचे किंवा सामग्रीचे प्रसारण केले जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर केंद्रीय मंत्रालयाने हे उदात्तीकरण थांबवण्याची सूचना केली आहे. अशी गाणी, तसेच सामग्रीमुळे संस्कारक्षम वयाच्या मुलांवर परिणाम होतो आणि बंदूक संस्कृतीला चालना मिळते, या बाबीची न्यायालयीन दखल पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने घेतली होती, याकडे मंत्रालयाने एफएम वाहिन्यांचे लक्ष वेधले आहे.