
म. टा. प्रतिनिधी, मुंबईः माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी यांच्या कथित मालकीच्या रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील १९ बंगल्यांचे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी रविवारी रेवदंडा पोलिस ठाण्यात रश्मी ठाकरे यांच्याविरोधात तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणी रश्मी यांच्याविरोधात गुन्हा नोंद केल्यास ठाकरे कुटुंबीयांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पोलिसांत तक्रार नोंदविल्यानंतर सोमय्या यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘येत्या काही दिवसांत रेवदंडा पोलिस ठाण्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अहवाल दिला जाईल. त्यानंतर सात दिवसांत रश्मी ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल होईल, असे आश्वासन मला देण्यात आले आहे,’ असे सोमय्या यांनी सांगितले. ‘उद्धव ठाकरे तत्कालीन मुख्यमंत्री असताना त्यांनीच रश्मी ठाकरे यांच्या मालकीचे १९ बंगले रेकॉर्डवरून गायब केले. मुख्यमंत्री कार्यालयाने यासाठी संबंधित यंत्रणेवर दडपण आणले,’ असे आरोपही सोमय्या यांनी केले. ‘या प्रकरणी रश्मी ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्यात जमिनीचे व्यवहार झाले आहेत. रश्मी ठाकरे यांच्या नावावर कोकणात कथित १९ बंगले होते. एका अधिकाऱ्यास ठाकरे यांनी १३ वर्षांमधील बंगल्यांचा तपशील नष्ट करण्याचे आदेश दिले. त्यांनी १३ वर्षे या बंगल्यांची घरपट्टी भरली होती; परंतु ठाकरे सरकारच्या काळात हे प्रकरण दडपण्यात आले,’ असा दावाही त्यांनी केला.