घटस्फोटासाठी अमानुष कृत्य; पत्नीला पाजले फिनेल अन् अंगावर फेकले ॲसिड, मालाडमधील घटना - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, January 7, 2023

घटस्फोटासाठी अमानुष कृत्य; पत्नीला पाजले फिनेल अन् अंगावर फेकले ॲसिड, मालाडमधील घटना

https://ift.tt/dcaAh8Z
मुंबई : मालाडच्या कुरारमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. पहिल्या पत्नीशी पटत नसल्याने पतीने दुसऱ्या महिलेला घरी आणले. मात्र, पहिली पत्नी घटस्फोट देत नसल्याने तिला फिनेल पाजले. तरीही ती ऐकत नसल्याने तिच्या अंगावर ॲसिड फेकले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी महिलेला रुग्णालयात दाखल केले. महिलेच्या तक्रारीवरून कुरार पोलिसांनी तिचा पती आणि त्याची दुसरी पत्नी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मालाडच्या पश्चिमेला राहणाऱ्या सलमान (बदललेले नाव) याने २०१७ मध्ये वांद्रे येथील न्यायालयात रुक्सना (बदललेले नाव) हिच्याशी विवाह केला. यानंतर मुस्लिम रितीरिवाजानेही दोघे विवाहबद्ध झाले. काही दिवस चांगले गेल्यानंतर सलमान याने रुक्सना हिला शारीरिक आणि मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. सलमान मारहाण करीत असल्याने त्याच्या त्रासाला कंटाळून रुक्सना ही माहेरी जाऊन राहू लागली. हीच संधी साधत सलमान याने दुसरे लग्न केले आणि आलिया हिला घरी आणले. आलियाशी लग्न केल्यानंतर सलमान घटस्फोटासाठी रुक्सना हिच्यावर दबाव टाकू लागला. मात्र तिने यासाठी स्पष्ट शब्दात नकार दिला. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात रुक्सना शिलाई मशीन घेण्यासाठी सासरी गेली होती. यावेळी सलमान आणि आलिया या दोघांनी घटस्फोटासाठी तयार करण्यात आलेली कागदपत्रे तिच्यासमोर सहीसाठी ठेवली. काही झाले तरी घटस्फोट देणार नसल्याचे ठरविले असल्याने रुक्सना हिने सही करण्यास नकार दिला. यावेळी दोघांनी तिला जबरदस्तीने फिनेल पाजले. तिने उलट्या करून हे सर्व फिनेल बाहेर काढल्यानंतर आलिया हिने बाथरूममधील ॲसिड आणून ओतले. रुक्सना हिने चेहरा तेवढ्यातच बाजूला केल्यामुळे तिच्या छातीवर ॲसिड पडले. तिचा आरडाओरड ऐकून आजूबाजूचे नागरिक जमा झाले. त्यांनी याबाबतची माहिती कुरार पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रुक्सना हिला उपचारासाठी रुग्णालयात नेले. उपचार पूर्ण झाल्यानंतर रुक्सना हिने पती सलमान आणि आलिया यांच्या विरोधात कुरार पोलिस ठाण्यात तक्रार केली.