दुर्मीळ रक्तगट, मध्यरात्री दोन वाजता प्रसुती अडली; सुनीलराव देवदूत झाले अन् दोन जीव वाचले - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, March 2, 2023

दुर्मीळ रक्तगट, मध्यरात्री दोन वाजता प्रसुती अडली; सुनीलराव देवदूत झाले अन् दोन जीव वाचले

https://ift.tt/W5q8ITl
जळगाव : पाचोरा शहरातील एका हॉस्पिटलमध्ये बाळंतपणासाठी दाखल झालेल्या गर्भवती महिलेला अचानक रक्ताची आवश्यकता निर्माण झाली होती, तिचा रक्त गट सुद्धा दुर्मिळ असा, मात्र चक्क रात्री दोन वाजताच्या सुमारास एका सामाजिक कार्यकर्त्याने महिलेला रक्तदान करत तिचे प्राण वाचविले आहे. वेळेवर रक्त मिळाल्यावर या महिलेने एका गोंडस अशा बाळाला जन्म दिला आहे. या घटनेची पाचोरा शहरासह तालुक्यात मोठी चर्चा रंगली असून रक्तदान करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याचे कौतुक केले जात असल्याचे पाहायला मिळत आहे. छाया गायकवाड हे जीवनदान मिळालेल्या महिलेचे नाव आहे, तर सुनील माळी असं तिच्यासाठी देवदूत बनून आलेल्या सामाजिक कार्यकर्त्याचं नाव आहे. रक्तदान हे श्रेष्ठदान मानले जाते. केव्हा कुणाला रक्ताची गरज पडेल, हे सांगणे कठीण आहे. दिवसभर कधीही रक्त मिळणे हे सहज शक्य आहे मात्र ओ निगेटिव्ह सारखा अत्यंत दुर्मिळ रक्तगट, तोही रात्रीच्या सुमारास मिळेल याची शाश्वती नाही. अशातच भडगाव तालुक्यातील पिचर्डे येथील छाया गायकवाड ही गर्भवती बाळंतपणासाठी येथील लिलावती रुग्णालयात दाखल झाली. घरात अठराविश्व दारिद्र्य आणि रुग्णासोबत कुणीही नाही. अशात तिला रक्ताची आणि तेही दुर्मिळ रक्तगटाची गरज पडली. तेव्हा रुग्णालय प्रशासनापुढे प्रश्न पडला इतक्या रात्री कुणाशी संपर्क साधावा. तेव्हा कॉंग्रेस पाचोरा तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्याशी रात्री दीड वाजताच्या सुमारास रुग्णालयाकडून संपर्क करण्यात आला. सोमवंशी यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने रुग्णालयात धाव घेतली. सोमवंशी यांनी कुठलाही वेळ न दवडता, तात्काळ त्यांच्या संपर्कातील एक-एक कार्यकर्त्याशी संपर्क करण्यात सुरुवात केली.या दरम्यान सामाजिक कार्यकर्ते सुनील माळी यांचा रक्तगट ओ निगेटीव्ह असल्याचं समोर आलं, त्यांना सोमवंशींनी तात्काळ रुग्णालयात बोलावून घेतलं, रात्री दोन वाजताची वेळ होती, सोमवंशी यांच्या शब्दाला मान देत, महिलेचा जीव वाचविण्यासाठी कुठलीही पर्वा न करता सामाजिक कार्यकर्ते सुनिल माळी हे गाढ झोपेत असताना उठून आले आणि त्यांनी रक्तदान केले.वेळेवर रक्त मिळाल्यामुळे डॉ वैभव सुर्यवंशी हे छाया गायकवाड यांचे प्राण वाचवू शकले. त्यानंतर प्रसुती होऊन छाया गायकवाड यांनी बाळाला जन्म दिला. यावेळी सचिन पाटील, ललित पाटील, शुभम मराठे उपस्थित होते. दुसर्‍या दिवशी छाया गायकवाड यांच्या नातेवाईकांनी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्यासह रक्तदाता सुनील माळी यांची भेट घेऊन आभार मानले.जर वेळेवर छाया गायकवाड यांना रक्त मिळाले नसते, तर अनर्थ ओढवू शकला असता, मात्र सुनील माळी हे रक्तदाता म्हणून देवदूत बनून आले. सुनील माळी यांनी रक्तदानातून इतरांसमोर मोठा आदर्श ठेवला असून जगात माणुसकी हाच मोठा धर्म असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे.