
मुंबई : ‘वाचाल तर वाचाल’, असे म्हटले जाते; मात्र सध्याची तरुण पिढी पुस्तकांपेक्षा समाजमाध्यमांवरील संदेश वाचण्यात आणि रील पाहण्यातच अधिक व्यस्त आहे. अशा पिढीला पुन्हा वाचनाकडे वळविणे, त्यांच्यामध्ये वाचन संस्कृती अधिक बळकट करणे यासाठी खाकी वर्दीतील एका अधिकाऱ्याची धडपड सुरू आहे. सहायक पोलिस निरीक्षक महेश गुरव हे गेल्या तीन वर्षांपासून आपल्या आईच्या स्मृतीप्रित्यर्थ वेगवेगळ्या प्रकारच्या पुस्तकांचे वाटप करतात. कुणाचा वाढदिवस असो वा अन्य कौटुंबिक कार्यक्रम, ते भेट म्हणून पुस्तकेच देतात. वाचन संस्कृती रूजविण्याच्या या कार्यात गुरव यांना वाचनाचा छंद जोपासणाऱ्या त्यांच्या पत्नी सहायक पोलिस निरीक्षक प्रमिला दौंडकर-गुरव यांची साथ लाभली आहे.चारशेपेक्षा अधिक पुस्तकांचा संग्रह मुंबई पोलिसांच्या संरक्षण आणि सुरक्षा विभागात कार्यरत असलेले महेश गुरव मूळचे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्याच्या दादपूर गावचे. पदवीधर असलेले गुरव सन २०१०मध्ये स्पर्धा परीक्षा देऊन पोलिस उपनिरीक्षक म्हणून महाराष्ट्र पोलिस दलामध्ये दाखल झाले. गडचिरोलीच्या नक्षलग्रस्त भागामध्ये सुरुवातीची तीन वर्षे सेवा बजावल्यानंतर २०१४मध्ये महेश गुरव यांची मुंबईत नेमणूक करण्यात आली. त्यांना कॉलेजमध्ये असल्यापासून वाचनाची आवड होती. पोलिस दलामध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी ही आवड स्वतःपुरती मर्यादित न ठेवता इतरांमध्येही निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यांचे ग्रामीण कथा, कादंबरी, धार्मिक ग्रंथ, ललित, वैचारिक, चरित्र, आत्मचरित्र असे सर्वच प्रकारातील वाचन सुरू आहे. मंत्रालय सुरक्षा विभागात नेमणुकीला असलेल्या त्यांच्या पत्नी प्रमिला यांनादेखील वाचनाची आवड आहे. दोघांनी आजतागायत चारशेपेक्षा अधिक पुस्तकांचा संग्रह आपल्या घरातील छोटेखानी पेढीत तयार केला आहे.वाचनाची आवड नातेवाईक, मित्रमंडळी, समाजामध्ये वाढावी यासाठी महेश गुरव झटत असतात. २०१९मध्ये त्यांच्या आईचे कॅन्सरने निधन झाले. तेव्हापासून आईच्या स्मृतीप्रित्यर्थ ज्या ठिकाणी संधी मिळते त्या ठिकाणी ते अवांतर वाचनाच्या पुस्तकांचे वाटप करतात. त्यांनी ज्या-ज्या पोलिस ठाण्यांमध्ये आत्तापर्यंत कर्तव्य बजावले आहे, त्या पोलिस ठाण्यांतील पोलिस सहकाऱ्यांना त्यांनी पुस्तकप्रेमी केले आहे. गाव शिवारातील धार्मिक कार्यक्रम असो वा कौटुंबिक कार्यक्रम, प्रत्येक ठिकाणी पारंपरिक आहेर देण्याऐवजी ते यजमानांना पुस्तकच भेट देतात व आपल्या मित्र परिवारालाही अशा स्वरूपाच्या उपक्रमासाठी प्रोत्साहन देतात.भालचंद्र नेमाडे लिखित ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ‘हिंदू - जगण्याची समृद्ध अडगळ’ हे पुस्तक महेश गुरव यांनी वाचले. त्यांना हे पुस्तक प्रचंड आवडले. त्यानंतर त्यांनी समाजमाध्यमांवर या पुस्तकाबाबत लोकांमध्येही जागृती केली. तसेच पूर्वापार वाचक असणाऱ्या मित्रपरिवाराला ते हे पुस्तक आवर्जून भेट देतात. अशाच प्रकारे गुरव आणि त्यांची पत्नी नवीन पुस्तके आणतात, वाचतात आणि वेगवेगळ्या माध्यमातून दुसऱ्यांना त्याचे महत्व पटवून देतात.दरवर्षी दहा हजारांची पुस्तके वाटण्याचे लक्ष्यसन २०२०मध्ये गावातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना गुरव यांनी उपयुक्त पुस्तके उपलब्ध करून दिली. मूळ गावी २०२२मध्ये त्यांचे घरात वास्तुशांती होती. याप्रसंगी आलेल्या मित्र परिवार व आप्तेष्ट यांना शंभर पुस्तके भेट म्हणून दिली.