
म. टा. प्रतिनिधी, मुंबई: मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर मतदारसंघातील सिनेट निवडणूकीचा नवा कार्यक्रम विद्यापीठाने जाहीर केला असून आता २१ एप्रिलला सिनेटसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या पदवीधर मतदारसंघातील निवडणूक जवळपास सहा महिने लांबणीवर गेल्याचे स्पष्ट झाले आहे.यापूर्वी मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर मतदारसंघाच्या सिनेट निवडणूकीसाठी १० सप्टेंबरला मतदान होणार होते. मात्र मतदारयादीत गोंधळाच्या आरोपांमुळे विद्यापीठाने ही निवडणूक प्रक्रिया रद्द केली आहे. आता नव्याने मतदार नोंदणी करण्याचा निर्णय विद्यापीठाने घातला आहे. विद्यापीठाने निवडणूकीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार सोमवारी ३०, ऑक्टोबरपासून मतदार नोंदणीला सुरुवात केली आहे. इच्छुकांना मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करता येईल. तर विद्यापीठाकडून या मतदार नोंदणी अर्जांची १ डिसेंबर ते २५ फेब्रुवारी या कालावधीत छाननी केली जाणार असून २६ फेब्रुवारीला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आलेल्या संभाव्य वेळापत्रकानुसार निवडणूकीची अधिसूचना २९ फेब्रुवारीला काढण्यात येणार आहे. निवडणूकीत उभे राहण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांचे ११ मार्चपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. सिनेटच्या पदवीधर मतदारसंघासाठी २१ एप्रिलला मतदान घेतले जाणार आहे. तर मतमोजणी २४ एप्रिलला केली जाणार असल्याचे विद्यापीठाने जाहीर केले आहे.