'तो' काही करण्याआधी आपण त्याला मारू; मित्रांनी कट रचला, आधी पाठलाग केला, नंतर धक्कादायक कृत्य - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, October 31, 2023

'तो' काही करण्याआधी आपण त्याला मारू; मित्रांनी कट रचला, आधी पाठलाग केला, नंतर धक्कादायक कृत्य

https://ift.tt/yVztdIH
पुणे: चोवीस तासांत गोळीबार आणि खुनाच्या दोन घटनांनी शहर सोमवारी हादरून गेले. खडकमाळआळीत रविवारी मध्यरात्री घरात शिरून तरुणाचा डोक्यात गोळी झाडून खून करण्यात आला. जुन्या भांडणाच्या रागातून दोन अल्पवयीन मुलांनी तरुणाचा गोळी झाडून खून केल्याची घटना धायरीत सोमवारी दुपारी घडली. या दोन्ही घटनेतील संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनांवरून टोळक्यांच्या दहशतीचा प्रश्न पुन्हा अधोरेखित झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनिल साहू (३५, रा. खडकमाळ आळी, घोरपडे पेठ) असे खून झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी एकावर खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत घुरणकुमार हरिदेव साहू (२४) याने फिर्याद दिली आहे. अनिल मूळचा बिहारमधील आहे. तो पत्नी आणि भावासह खडकमाळ आळीत सिंहगड गॅरेज चौक परिसरातील श्रीकृष्ण हाइट्स सोसायटीत राहत होता. डेक्कन भागातील दुकानात तो झरीचे नक्षीकाम करायचा. मध्यरात्री दोनच्या सुमारास दरवाजा वाजला. घुरणकुमारने दरवाजा उघडला. तुझ्या भावाला बोलाव, असे आरोपीने सांगितले. ही चर्चा ऐकून अनिल बाहेर आला. अनिल आणि आरोपी यांच्यात वाद झाला. आरोपीने कपाळावर बंदूक लावून गोळी झाडली. या हल्ल्यात अनिल जागेवर कोसळला. आरोपी इमारतीच्या बाहेर थांबलेल्या साथीदारासह दुचाकीवरून पळून गेला. गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या अनिलला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी गुन्हे शाखेने संशयित तिघांना ताब्यात घेतले असून मुख्य आरोपी फरार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.जुन्या भांडणाच्या रागातून दोन अल्पवयीन मुलांनी तरुणाचा गावठी कट्ट्यातून गोळी झाडून खून केल्याची घटना सोमवारी दुपारी धायरीत घडली. ओंकार तानाजी लोहकरे (१९, रायकर मळा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि मृत तरुण यांची लहानपणापासून भांडणे होती. त्यांना सुधारगृहात ठेवण्यात आले होते. तेथेही त्यांची भांडणे होत होती. एक वर्षापूर्वी ते बाहेर आले. ओंकार इतर मुलांना घेऊन अल्पवयीन मुलांच्या घरासमोर फिरत असायचा. ओंकार आपल्याला मारेल अशी भीती या दोघांना होती. ओंकारने काही करण्याआधी आपण त्याला मारू, असे दोघांनी ठरवले. दोघांनी ओंकारवर लक्ष ठेवले. सोमवारी दुपारी चार वाजता त्यांनी ओंकारचा पाठलाग केला. धायरी येथील सिल्हर बर्च रुग्णालयाजवळ ओंकारवर गोळी झाडण्यात आली. गोळी चुकवून ओंकारने पळ काढला. खडक चौकात दुसऱ्यांदा गोळीबार करण्यात आला. गोळी पाठीत घुसल्याने गंभीर जखमी झालेल्या ओंकारचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलिसांनी अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले.