
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : वायुप्रदूषण नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्यांवर मुंबई महापालिकेचे कारवाई सत्र सुरूच आहे. बीकेसीत मेट्रो प्रकल्पात नियम धाब्यावर बसवणाऱ्या कंत्राटदाराला काही दिवस काम थांबवण्यास सांगण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली, तर सागरी किनारी मार्गाच्या (कोस्टल रोड) रेडिमिक्स काँक्रिट (आरएमसी) प्लाण्टमध्ये धुळप्रतिबंधक उपाययोजना ठेवण्याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे.धुळनियंत्रणासाठी जारी केलेल्या उपाययोजना न केल्याने पालिकेने वांद्रे, खार, सांताक्रुझमधील २२ बांधकाम व्यावसायिकांची कामे थांबवली आहेत. यासह उपाययोजनांसाठी मुंबईत सुमारे सहा हजार बांधकामांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यापाठोपाठ मोठ्या सरकारी प्रकल्पांवरही पालिकेने बारीक नजर ठेवली आहे. सागरी किनारी मार्गाचे मरिन ड्राइव्ह ते वरळीदरम्यान काम सुरू आहे. प्रकल्पाचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. प्रकल्पात सिमेंट क्राँकिटचा वापर करण्यासाठी आरएमसी प्लाण्ट असून, त्याठिकाणी धुळप्रतिबंधक उपाययोजना ठेवण्याबाबत पालिकेने नोटीस बजावली आहे. प्रकल्पाशी संबंधित अधिकाऱ्यांनी त्यास दुजोरा दिला आहे. ‘प्रकल्पात तीन ठिकाणी आरएमसी प्लाण्ट आहेत. तिन्ही ठिकाणे धुळप्रतिबंधक मार्गदर्शक तत्त्वांनुसार झाकण्यात आली आहेत. याठिकाणी व्यवस्थित उपापययोजना केल्या आहेत. पालिकेने सूचना पत्र पाठवले आहे’, असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.मेट्रो-३ कुलाबा-वांद्रे-सीप्झ प्रकल्पाचे काम बीकेसीत सुरू असून याठिकाणी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्याबद्दल कंत्राटदाराला काही दिवस काम थांबविण्यास सांगण्यात आले आहे. धुळप्रतिबंधक कापडाचे आच्छादन, पत्रे, पाणीफवारणी प्रकल्पात होत नसल्याचे आढळून आले आहे. आवश्यक उपाययोजना केल्यानंतर काम सुरू करण्यास परवानगी देण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या वांद्रे/एच पूर्व विभाग कार्यालयातील सूत्रांनी दिली.बीकेसी परिसरात पायाभूत सुविधांची कामे करणाऱ्या सर्व कंत्राटदारांना धूळ कमी करण्याच्या उपायांचे पालन करण्यास सांगितले आहे. मेट्रोच्या कंत्राटदाराने यांचे पालन केले नसल्याने त्यांना काम थांबवण्याची नोटीस बजावण्यात आली असल्याचे समजले. पालिकेने बुलेट ट्रेन प्रकल्पालाही सूचनापत्र दिले असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी एच पूर्व विभागाच्या सहायक आयुक्त स्वप्नजा क्षीरसागर यांच्याशी वारंवार प्रयत्न करूनही संपर्क होऊ शकला नाही.