
अकोला: आज काँग्रेसनं सात लोकसभा उमेदवारांच्या नावे जाहीर केली आहे. सोबतच अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केला आहे. अकोला महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. साजिद खान पठाण हे आता काँग्रेसचे अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणुकीत अधिकृत उमेदवार असणार आहेत. दरम्यान अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आजच शिवसेना ठाकरे गटाकडून महापालिकेतील शिवसेना गटनेते राजेश मिश्रांची नावाची उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे आता अकोल्यात महाविकास आघाडीत आता बिघाडी होण्याची शक्यता आहे. अकोला पश्चिम विधानसभा काँग्रेसचा परंपरागत मतदारसंघ आहे. दरम्यान काँग्रेसला लोकसभा जिंकायची असेल तर अकोला पश्चिम ठाकरे गटाला सोडा, असा दबावतंत्र ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांनी काँग्रेसवर टाकला होता. दरम्यान २६ एप्रिलला लोकसभेसोबतच अकोला पश्चिम विधानसभेसाठी पोटनिवडणूक होत आहे. भाजप आमदार गोवर्धन शर्मांच्या निधनानं ही पोटनिवडणुक होऊ घातली आहे. १९९५ ते २०२३ निधनापर्यंत सलग सहा वेळा गोवर्धन शर्मांनी अकोला पश्चिम मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. दरम्यान देशभरात लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत अकोला पश्चिम विधानसभाची पोटनिवडणूक होत आहे. एकीकडे भाजपात या पोटनिवडणुकीच्या जागेच्या उमेदवारीवरून अंतर्गत कलह सुरू असतानाच आता काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केला आहे. अकोला महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेता साजिद खान पठाण हे आता काँग्रेसचे अधिकृत उमेदवार असणार आहेत. आता भाजप कोणाला संधी देते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान भाजपकडून दिवंगत गोवर्धन शर्मा यांच्या कुटुंबातील कृष्णा शर्मा, महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांच्यासह आणखी १६ जण शर्यतीत आहे.